नगर, दि. 2 (प्रतिनिधी) – यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडातील संशयित मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्याविरोधात स्टँडिंग वॉरंटसाठी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी हा अर्ज दाखल केला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.
30 नोव्हेंबरला रेखा जरे यांची पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात गळा चिरून हत्या झाली. त्या हत्याकांडात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. हत्याकांडाचा मुख्य संशयित सूत्रधार बाळ बोठे याचे नाव पुढे आले आहे. तेव्हापासून तो पसार आहे. बोठे याने अटकपूर्व जामिनासाठी देखील जिल्हा न्यायालयात प्रयत्न केले. मात्र, जिल्हा न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.
बोठे याच्या शोधासाठी जिल्हा आणि जिल्ह्याबाहेर अनेक ठिकाणी पोलिसांनी छापे घातले. परंतु बोठेला पकडण्यात पोलिसांना अजून यश आले नाही. अजूनही पोलिसांची पथके बोठे याच्या मागावर आहेत. या दरम्यान पोलीस दलाने बोठेभोवती कायद्याचा फास आवळण्याची तयारी सुरू केली आहे. जरे आणि बोठे याच्या घराची पुन्हा झडती घेतली. त्यात पोलिसांना अजून काही महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत.
‘त्या’ डायरीतून सापडले नवीन कारनामे..!
बोठे याला पकडण्यात पोलिसांना अद्यापही यश आले नसले, तरी जरे यांच्या घरातून एक महत्त्वाची डायरी पोलिसांच्या हाती लागली आहे. पोलिसांनी ती जप्त केली असून, त्यात जरे हत्याकांड प्रकरणातील महत्त्वाचे आणखी पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्या डायरीतील टिपण्णीमुळे बोठे याच्या अडचणीत आता आणखी भर पडली आहे.