परीक्षा शुल्कातून 13 कोटींचा गल्ला जमा
19 जानेवारीला परीक्षा घेण्यात येणार
पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (टीईटी) 3 लाख 43 हजार उमेदवारांची ऑनलाइन अर्ज नोंदणी पूर्ण झाली आहे. मागील दोन वर्षांतील परीक्षांच्या तुलनेत यंदाच्या परीक्षेसाठी अर्ज नोंदणी मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. या परीक्षा शुल्कातून परिषदेच्या तिजोरीत तब्बल 13 कोटी रुपये जमा झाले आहेत. येत्या 19 जानेवारीला “टीईटी’ची परीक्षा घेण्यात येणार आहे.
सर्वसाधारण, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग, भटक्या विमुक्त जाती व जमातींच्या उमेदवारांकडून एका पेपरसाठी 500 रुपये तर दोन्ही पेपरसाठी 800 रुपये परीक्षा शुल्क परीक्षेकडे जमा झालेले आहे. अनुसूचित जाती व अनुसचित जमाती, अंपग उमेदवारांकडून एका पेपरसाठी 250 रुपये तर दोन्ही पेपरसाठी 400 रुपये शुल्क जमा झालेले आहे. या शुल्काच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये परिषदेकडे गोळा झालेले आहेत. परीक्षा परीक्षेला विविध परीक्षा माध्यमातून लाखो रुपयांचे शुल्क दरवर्षी जमा होत असते. त्यात सतत वाढच होत असते ही वस्तुस्थिती आहे.
पहिल्या पेपरसाठी 1 लाख 88 हजार 678 तर दुसऱ्या पेपरसाठी 1 लाख 54 हजार 586 अशा एकूण 3 लाख 43 हजार 264 इतक्या उमेदवारांनी अर्ज नोंदणी केलेली आहे. “टीईटी’ च्या सन 2013 पासून ते आजतागायत पाच परीक्षा घेण्यात आलेल्या आहेत. आता सहावी परीक्षा होणार आहे. 22 जून 2017 रोजी झालेल्या परीक्षेत पहिल्या पेपरसाठी 1 लाख 69 हजार 950 तर दुसऱ्या पेपरसाठी 1 लाख 27 हजार 727 एवढ्या उमेदवारांनी नोंदणी केली होती. 15 जुलै 2018 रोजी झालेल्या परीक्षत पहिल्या पेपरसाठी 95 हजार 787 तर दुसऱ्या पेपरसाठी 77 हजार 662 उमेदवारांनी अर्ज दाखल भरले होते. त्यात आता वाढ झालेली आहे. काही उमेदवारांकडून परीक्षा शुल्क भरताना बॅंक खात्यातून दोन वेळा रक्कम ट्रान्सफर झाली आहे. ही रक्कम संबंधित उमेदवारांना परत करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेले आहे.
दोन स्तरांवर परीक्षा घेणार
टीईटी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठीची मुदत गुरुवारी (दि.28) संपली आहे. आता उमेदवारांना 4 जानेवारीपासून प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेता येणार आहेत. प्राथमिक स्तरावर इयत्ता पहिली ते पाचवी व उच्च प्राथमिक स्तरावर इयत्ता सहावी ते आठवी या दोन स्तरांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे.