पुणे – विद्यापीठाच्या प्रशासकीय व शैक्षणिक विभागात एकाच ठिकाणी 10 वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतला आहे. त्यानुसार शुक्रवारी 40 कर्मचाऱ्यांची बदली केली असून, त्याची सुरुवात कुलगुरू कार्यालयातून झाली आहे. तब्बल 13 वर्षांनंतर आता कर्मचाऱ्यांचे बदल्याचे सत्र सुरू झाले आहे.
पुणे विद्यापीठात अधिकारी व कर्मचारी मिळून सुमारे 1 हजार 200 जण विविध विभागांत कार्यरत आहेत. त्यामध्ये वर्ग तीन व चारच्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. शासनाच्या नियमानुसार दर 3 वर्षांनी बदली करणे अपेक्षित आहे, पण 2006 पासून अनेकांच्या बदल्या झालेल्या नाहीत. 70 टक्के अधिकारी व कर्मचारी तीनपेक्षा जास्त वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. त्याचा परिणाम कामकाजावर होत होता. पहिल्या टप्प्यात वर्ग चारमधील 40 जणांच्या बदल्या केल्या आहेत. पुढील टप्प्यात वर्ग तीन, वर्ग दोनमधील कर्मचारी, अधिकऱ्यांच्या बदल्या होणार आहेत.
विद्यापीठात प्रदीर्घ कालावधीपासून बदल्या झालेल्या नव्हत्या. त्यामुळे अशा बदल्या केल्या जात आहेत. हा विद्यापीठाच्या प्रशासकीय धोरणाचा एक भाग आहे. या बदल्या करताना विद्यापीठाचे कामकाजावर कोणताच परिणाम होणार नाही, याची काळजी घेतली आहे.
– डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव