पुणे – महापालिका हद्दीतील एक लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटूंबातील सदस्यांना महापालिकेकडून शहरी गरीब वैद्यकीय योजनेअंतर्गत पालिकेच्या पॅनेलवरील रूग्णालयात ठराविक खर्चापर्यंत मोफत उपचार मिळतात. मात्र, आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधी महापालिकेचे शहरी गरीब योजनेचे कार्ड घेणे बंधनकारक केले आहे.
अनेकदा रूग्ण थेट रूग्णालयात दाखल होतात आणि नंतर बिलाच्या वेळी या योजनेचे सभासद घेऊन महापालिकेचे पत्र घेतात. या निर्णयामुळे ही पद्धत बंद होणार आहे. याबाबतचे आदेश महापालिकेचे आयोग्य प्रमुख भगवान पवार यांनी नुकतेच काढले आहेत. त्यामुळे शहरी गरिबांना आता प्रत्येक वर्षी मार्च महिन्यात या कार्डचे नूतनीकरण करावे लागणार आहे. अथवा गरज नसली तरी तातडीच्या वेळी अडचण येऊ नये यासाठी नोंदणी करून घ्यावी लागणार आहे. दरम्यान, महापालिकेने ही योजना ऑनलाईन केली असून रूग्ण रूग्णालयात दाखल झाल्यानंतर या योजनेचा सभासद असल्यास त्याचे हमीपत्र ऑनलाईन घेतले जात आहे. त्यामुळे, पूर्व नोंदणी नसल्यास हे ऑनलाईन प्रमाणपत्र देता येणार नसल्याने अटींमध्ये बसणाऱ्या शहरी गरिबांनी आधीच कार्ड काढून घेणे बंधनकारक असणार आहे.
काय आहे योजना
शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना ही पुणे महापालिका कार्यक्षेत्रातील पिवळे रेशनकार्डधारक, ग.व.नि सेवाशुल्कधारक व केशरी रेशनकार्डधारक ज्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापर्यंत असणाऱ्या गरीब कुटुंबीयांसाठी दरवर्षी एप्रिल ते मार्च या कालावधीत लागू करण्यात येते. ही योजना फक्त जनरल वॉर्डसाठी लागू असते. यात पॅनेलवरील खासगी हॉस्पिटलमधील अंतर्रुग्ण विभागातील वैद्यकीय उपचारांसाठी सी.जी.एस.एस. मान्य दराने 50% किंवा 100 % हमीपत्रांतर्गत एका वर्षासाठी एका कुटुंबाला एक लाख किंवा दोन लाख या मर्यादेपर्यंत खर्चाचे दायित्व महापालिका घेते तर उर्वरित खर्च रूग्णास करावा लागतो.
सभासद होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- झोपडपट्टीत राहत असल्यास महापालिकेचे सेवा शुल्क भरल्याची पावती.
- तहसीलदार यांचा 1 लाखांच्या आतील उत्पन्नाचा दाखला
मनपा कार्यक्षेत्रातील पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड - अपत्यांचे आधार कार्ड (वय वर्ष 25 खालील)
- कुटुंबातील पात्र सर्व सभासदांचे दोन फोटो (आयकार्ड साईज)