सैफच्या ‘तांडव’बाबत गृहमंत्री म्हणाले, “कायद्याप्रमाणे कारवाई केली जाईल’

मुंबई – वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या ‘तांडव’ या वेब सिरीजचा डायरेक्‍टर अली अब्बास जाफरने नुकतंच ट्‌विटरवर माफी मागून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. ‘तांडव’ या वेबसिरीजमध्ये दाखवलेली कथा आणि प्रत्यक्षातील घटना यामधील साधर्म्य हा केवळ एक योगायोग आहे. या वेबसिरीजमधील कलाकार आणि निर्मात्यांना कोणाच्याही भावना दुखवायचा हेतू नाही. असं अली ने ट्विटमध्ये म्हंटलं.

दरम्यान, या सर्व “तांडव’ प्रकरणानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुद्धा आपली भूमिका मांडली. “केंद्र सरकारने या प्रकरणाबाबत काही ठोस पावले उचलली पाहिजेत’ असं मत गृहमंत्र्यांनी व्यक्त केलं. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ‘तांडव’ वेबसीरीजबाबत आमच्याकडे तक्रार आली असून त्यावर कायद्याप्रमाणे कारवाई केली जाईल. पण ओटीटी प्लॅटफॉर्मसवर सध्या कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नसल्यामुळे याबाबत केंद्र सरकारने कायदा आणला पाहिजे. असं अनिल देशमुख म्हणाले.

अॅमेझॉन प्राइमवर ‘तांडव’ ही वेबसीरीज प्रदर्शित झाली असून यामध्ये हिंदू देवतांबाबत काही आक्षेपार्ह वक्तव्य आणि धार्मिक भावना दुखावल्याचे काही आरोप राजकीय नेत्यांनी केले होते. या वेबसिरीजचा पहिला एपिसोड लॉन्च झाल्यावर लगेच त्याच्याविरोधात प्रतिक्रिया उमटू लागली होती. सोशल मीडियावर देखील ‘हॅशटॅग बॅन तांडव’ हे अभियान सुरू झाले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.