मुंबई – उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील 2088 सहाय्यक प्राध्यापक व 370 प्राचार्य या संवर्गातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
आरोग्य विषयक कारणास्तव प्रलंबित असलेल्या भरती प्रक्रियेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वित्त विभागाने भरती प्रक्रियेवरील निर्बंध शिथील करुन पदभरती करण्यास मान्यता दिली आहे. ही भरती टप्प्याटप्प्याने होणार असून याबाबतचा शासननिर्णय लवकरच निर्गमित करण्यात येईल, असेहीसामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.
उदय सामंत म्हणाले, कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे दिड ते दोन वर्षापासून भरतीवर राज्य शासनाने निर्बंध घातले होते. आजपर्यंतच्या 370 प्राचार्यांची 100 टक्के रिक्त पदे भरण्यास दि. 23 मार्च 2021 रोजीच्या च्या शासन निर्णयान्वये मान्यता दिली आहे. तसेच त्याबाबतची भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. आता यापुढे प्राचार्याची रिक्त होणारी पदे भरण्यास मंजूरी देण्यात आली आहे.
1 ऑक्टोबर 2020 च्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या आधारे विभागाने सहाय्यक प्राध्यापकांची पदे भरण्याचा प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर केला होता. परंतु 2088 पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याबाबतचा शासन निर्णय लवकरच निर्गमित होईल. ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे होणार असून यशस्वी उमेदवारांची नियुक्ती सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात करण्यात येणार असल्याचेही सामंत यांनी सांगितले.
मानधनात 25 टक्के भरीव वाढ
उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय व अनुदानित महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर पदांसाठी घड्याळी तासिका तत्त्वावर कार्यरत असलेल्या कनिष्ठ अधिव्याख्यात्यांच्या मानधनाचे दर सुधारित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मानधनाच्या दरात सर्वसाधारण 25 टक्के एवढी भरीव वाढ करण्यात आली असून ही वाढ केवळ 3 वर्षाच्या कालावधीत करण्यात आलेली आहे.