पारंपरिक एचआर विभागातर्फे कर्मचाऱी भरती करण्याच्या प्रक्रियेत फेडरल बॅंकेने आमूलाग्र बदल केला असून आता भरतीचे संपूर्ण कामकाज कृत्रिम बुद्धीमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स – एआय) प्रक्रियेद्वारे राबवण्यात येणार आहे.
देशातील बॅंकिंग क्षेत्रात हा अशा प्रकारची व्यवस्था स्वीकारणारी फेडरल बॅंक ही पहिली बॅंक आहे. त्यासाठी फेडरिक्रूट नावाचे टूल विकसित करण्यात आले असून त्याद्वारे एचआर विभागाची सर्व कामे केली जातील. अगदी शेवटच्या टप्प्यात एचआर एक्झिक्युटिव्ह नव्याने भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना भेटतील. एवढाच या सगळ्या प्रक्रियेत मानवी सहभाग असेल.
उमेदवाराचे व्यक्तिमत्व जाणून घेण्यासाठी रेझ्युमी आणि मुलाखत, गटचर्चा या पारंपरिक पद्धतीऐवजी या सगळ्या घटनांची मालिका, डेटा पॉईंटस् फेडरिक्रूट मार्फत करण्यात येईल. रोबोद्वारे मुलाखती, मानसिक आणि खेळांवर आधारीत मूल्यमापन प्रक्रियेतून हे डेटा पॉईंटस् जमा केले जातील. चॅटबोट म्हणजेच चॅटिंग करणारे रोबो मुलाखतीला सुरवात करतील आणि शेवटी ऑफर लेटरही चॅटबोटद्वारे पाठवण्यात येणार आहे.
चालू आर्थिक वर्षात 300 प्रोबेशनरी ऑफिसर रुजू करून घेण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी ऑक्टोबरपर्यंत 150 जणांची नियुक्ती झालेली आहे. आता उरलेल्या 150 जणांची निवड आणि नियुक्ती डिसेंबरमध्ये फेडरिक्रूटकडून केली जाणार आहे.