ब्रासिलिया. (ब्राझिल) – ब्राझिलमध्ये करोनाच्या साथीमुळे जगभरातील दुसऱ्या क्रमांकाच्या बळींची नोंद झाली आहे. करोनाची साथ देशात पसरण्याला जबाबदार मानून अध्यक्ष बोल्सेनारो यांच्यावर गुन्हेगारी स्वरुपाच्या आरोपांची शिफारस सिनेटने केली आहे.
करोनाच्या साथीला सरकारकडून हाताळण्याची चौकशी गेल्या सहा महिन्यांपासून एका समितीकडून सुरू आहे. अध्यक्ष बोल्सेनारो यांच्यावर खटला चालवण्याची शिफारस या समितीने 7 विरुद्ध 4 मतांनी केली आहे. बोल्सेनारो यांच्यावर ढोंगीपणा आणि सार्वजनिक निधीचा गैरवापर करण्यासाठी चिथावणी देण्याचा आणि मानवतेविरोधात गुन्ह्याचा आरोप आहे. याशिवाय ब्राझिलमधील 6 लाख करोना बळींच्या मृत्यूलाही बोल्सेनारो यांना जबाबदार धरण्यात आले आहे.
बोल्सेनारा यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या आरोपांपैकी मानवतेविरोधातील गुन्ह्याची सुनावणी आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयात व्हायला लागणार आहे. समितीच्या शिपारसींचा काळजीपूर्वक अभ्यास करावा लागेल असे बोल्सेनारो यांच्यावतीने सरकारी वकिलांनी म्हटले आहे.
2022 मध्ये ब्राझिलमध्ये अध्यक्षीय निवडणूका होणार आहेत. चौकशी समितीने गंभीर आरोपांची शिफारस केल्यामुळे बोल्सेनारो यांच्यासाठी ही निवडणूक अवघड बनली आहे. करोनाची साथ सुरू असताना स्थानिक निर्बंधांना बोल्सेनारो यांनी कमी महत्व दिले. तसेच कमी परिणामकारक असलेल्या मलेरिया विरोधी औषधांचा वापर वाढवला, सार्वजनिक एकत्रीकरण आयोजित केली आणि औषधांवर अविश्वासही दाखवला होता.