नवी दिल्ली – जैश – ए – मोहंमदचा दहशतवादी आणि शोपीयनचा रहिवासी असणाऱ्या हिदायतुल्लाह मलिक याला अटक केल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हल यांच्या निवासस्थान आणि कार्यालयातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली.
या दहशतवाद्याने सरदार पटेल भवन आणि दिल्लीतील महत्वांच्या ठिकाणी रेकी केली आणि त्याची माहिती आपल्या पाकिस्तानातील हॅंडलरला पाठवल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर डोव्हल यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मलिकला सहा फेब्रुवारीला अटक करण्यात आली. तसेच अन्य चार जणांकडे याबाबतचा तपास करण्यात आला. त्यात दोन शोपीयनचे रहिवासी आहेत, त्यात मलिकची पत्नी, चंदिगढमध्ये शिकणारा एक विद्यार्थी आणि बिहारच्या एका रहिवाशाचा समावेश आहे, असे सूत्रांनी सांगितले.
मलिकला अटक केली त्यावेळी त्याकडे शस्त्रे आणि दारूगोळा सापडला होता. त्याच्यकडून एक वाहन ताब्यात घेण्यात आले होते. अनंतनागमध्ये जैशची दहशतवादी कृत्ये करणारी आघाडी लष्करे – ए – मुस्तफाचा प्रमुख असणाऱ्या मलिकला अटक करण्यात आल्यानंतर त्याच्यावर ग्यानगल पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.
पाकिस्तानी हॅंडलरकडे चित्रीकरण –
मलिक अटक केल्यानंतर तपास अधिकाऱ्यांकडे अनेक धक्कादायक खुलासे करू लागला. त्याने सांगितले की, त्याचा डॉक्टर नावाचा पाकिस्तानी हॅंडलरने केलेल्या सुचनांवरून 25 मे 2019 ला डोव्हल यांच्या कार्यालयाचे व्हिडिओ शुटींग केले होते. त्या शिवाय नवी दिल्लीतील अनेक महत्वाच्या संस्थांचे चित्रीकरण केले होते.
तो श्रीनगरहून विमानाने 24 मे 2019 ला दिल्लीला पोहोचला. ही रेकी करून तो बसने काश्मिरला पोहोचला. त्याने जम्मू काश्मिर पोलिसांच्या तपास अधिकाऱ्यांना सांगितले की, त्याने सांबा सीमा क्षेत्राचीही रेकी केली आहे. सांबामधील रेकी त्याने बन टोल प्लाझा हल्ला प्रकरणात अटकेत असणाऱ्या अन्य एका अतिरेक्यासह केली होती. अन्य एका दहशतवाद्याला त्याने फिदायिन हल्ल्यासाठी सॅन्ट्रो मोटार दिली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
अन् पोपटासारखी नावे सांगितली –
जम्मू काश्मिर बॅंकेची 60 लाख रुपयांची रोकड घेऊन जाणारी जैश ए महंमदच्या तीन अतिरेक्यांची नावे मलिकने पोलिसांना सांगितली आहेत. त्याच्या संपर्कात असणाऱ्या किमान आठ अतिरेक्यांची नावे त्याने पोलिसांना सांगितली आहेत. त्याचा एक सहकारी जान महंमद याच्या कडून बिहारमधील छाप्रामधून त्याने सात पिस्तुले मिळवली होती. त्याला अलीकडेच चंदिगढमधून ताब्यात घेण्यात आले होते.
डोव्हल हे दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर पाकिस्तानवरील 2016च्या सर्जिकल स्ट्राईकपासून आहेत. 2019 मध्ये केलेल्या बालाकोट हल्ल्यापासून त्यांचा समावेश सर्वाधिक संरक्षण देण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये होतो. त्यामुळे डोव्हल यांना असणाऱ्या धोक्याची माहिती सुरक्षा यंत्रणा आणि गृहमंत्रालयाला कळवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.