नवी दिल्ली, – महाराष्ट्र कॉंग्रेसची जंबो कार्यकारिणी हनुमानाच्या शेपटीप्रमाणे वाढत चालली आहे. कॉंग्रेसच्या धोरणांचा खरपूस समाचार घेणारे संजय निरूपम यांची संसदीय मंडळाच्या सदस्यपदी वर्णी लावण्यात आली आहे.
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नवनियुक्त कार्यकारिणीत आज सात नावांची आणखी भर पडली. महाराष्ट्र महिला कॉंग्रेसच्या माजी अध्यक्ष चारूलता टोकस, नाना गावंडे, संजय राठोड आणि सचिन नाईक यांना उपाध्यक्ष बनविण्यात आले आहे. तर मुंबई कॉंगेसचे तीन माजी अध्यक्ष संजय निरूपम, एकनाथ गायकवाड आणि जनार्दन चांदुरकर यांची संसदीय मंडळात सदस्य म्हणून वर्णी लागली आहे.
मुंबई महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत कॉंग्रेसचा धुव्वा उडाल्यानंतर संजय निरूपम यांनी मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर त्यांनी कॉंग्रेस हायकमांडवर नित्यनेमाने तोंडसुख सुध्दा घेतले. मात्र, आता त्यांना संसदीय मंडळात सामावून घेण्यात आले आहे.
मुंबई महानगर पालिकेची निवडणूक तोंडावर असताना तिन्ही माजी अध्यक्षांना समितीत सामावून घेणे रणनितीचा भाग असल्याची चर्चा आहे. या निवडीमुळे कॉंग्रेसने आगामी निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. या आधी मुंबई शहरचे अध्यक्ष म्हणून भाई जगताप यांची निवड केली आहे.