रावणगाव- करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तो आपल्या गावात शिरू नये यासाठी रावगाव (ता. दौंड) येथे विविध उपाययोजना राबवण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून बुधवार (दि. 22 ) ते शुक्रवार (दि.24 ) सलग तीन दिवस रावणगाव कडकडीत बंद पाळण्यात येणार असल्याची माहिती करोना आपत्ती व्यवस्थापन समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
बंद काळात गावातील दवाखाने आणि मेडिकल वगळता फळे, भाजीपाला, किराणा दुकाने, हॉटेल, ढाबे, मटण विक्रीसह इतर सर्वच सेवा बंद राहतील. तसेच पाणी पुरवठा व दूध संकलन सकाळी 6 ते 9 व सायंकाळी 6 ते 9 या वेळेत सुरू राहणार आहे. या तीन दिवसांच्या कालावधीत कोणीही विनाकारण गावात फिरू नये, गर्दी न करता सोशल डिस्टन्स पाळावे व हा बंद उत्स्फूर्तपणे पाळावा, असे आवाहन समितीचे अध्यक्ष सरपंच शिवाजी आटोळे , सचिव भिमराव खोमणे, मंडलाधिकारी मंगेश नेवसे, तलाठी दीपक पांढरपट्ठे , कृषी सहाय्यक अंगद शिंदे, पोलीस प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. तसेच संचार बंधीचे उल्लंघन केल्यास पोलीस प्रशासनाच्या वतीने कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.