रत्नागिरी : वर्षभरापासून कॅन्सरशी लढत असलेल्या मुलीने वडिलांच्या हातावर अखेरचा श्वास घेतला. दु:ख सहन न झाल्याने वडिलांनीही प्राण सोडल्याची अत्यंत दु:खद घटना घडली आहे. मुलीचे नाव प्राजक्ता कदम (वय 28) तर नंदकुमार कदम (वय 55, मुळ रा. बसणी) असे वडिलांचे नाव आहे. ही घटना सोमवारी घडली आहे. एकाच वेळी बाप-लेकीवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ कदम कुटुंबीयांवर आल्याने कुटुंबासह परिसरात दु:खाचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नंदकुमार कदम जिल्हा परिषदेत आरोग्य विभागात सहाय्यक लेखाधिकारी म्हणून कार्यरत होते. मुलगी प्राजक्ताचे लग्नही ठरले होते. घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र, वर्षांपूर्वी प्राजक्ता आजारी पडली. रूग्णालयात दाखल केल्यानंतर कॅन्सर झाल्याचे स्पष्ट झाले. वर्षभर तिच्यावर उपचार सुरू होते. हळूहळू ती बरी होत होती.
मात्र, दोन दिवसांपूर्वी तिला अचानक फिट आली. तीला रूग्णालयात दाखल करेपर्यंत तीने वडिल नंदकुमार यांच्या हातावरच अखेरचा श्वास घेतला. लाडक्या मुलीचा मृत्यू पाहून दु:ख झाल्याने ते जागेवरच कोसळले. डाॅक्टरांकडे उपचारासाठी नेले असताना तेथे त्यांना मृत घोषीत करण्यात आले. बाप-लेकीच्या मृत्यूनंतर जि.प. भवन तसेच बसणी गावावर शोककळा पसरली आहे.