देशभर उपक्रम : पु. ल. देशपांडे उद्यान येथे उद्घाटन
पुणे – उन्हाळ्यात तहानलेल्या व्यक्तीस स्वच्छ, थंडगार व शुद्ध पाणी मिळाल्यास किती बरे वाटेल याची कल्पनाच किती सुखकारक आहे. ही कल्पना प्रत्यक्षात पुलक प्याऊ या उपक्रमाच्या माध्यमातून आर.एम.डी. फाउंडेशनच्या उपाध्यक्षा शोभा आर. धारीवाल यांनी देशभर राबविण्यास सुरुवात केली आहे.
आकर्षक रचना, पाण्याची शुद्धता व तंत्रज्ञान अशी सोय असलेले आधुनिक वॉटर कुलरचे उद्घाटन नुकतेच शोभा आर. धारीवाल यांच्या हस्ते पु. ल. देशपांडे उद्यान सिंहगड रोड पुणे येथे करण्यात आले व पुलक प्याऊ उपक्रम जनतेसाठी खुला करण्यात आला.
उद्घाटनप्रसंगी शोभा आर. धारीवाल म्हणाल्या की पुलकप्याऊ उपक्रम पुलकमंच यांच्या सहकार्याने संपूर्ण भारतभर राबविण्यात येत आहे. राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्रातील नागपूर, वर्धा, अमरावती, पुणे शहर व जिल्ह्यातील बारामती, नीरा, लोणंद इत्यादी ठिकाणी सद्यस्थितीत पुलक-प्याऊ उभारण्यात आलेले आहेत. क्षारयुक्त, अशुद्ध पाणी प्यायल्याने पोटाचे विकार वाढतात. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून दिल्याचा आनंद वाटतो, असे त्या म्हणाल्या.
याप्रसंगी सिंहगड रोड प्रभाग 30 च्या नगरसेविका अनिता कदम यांनी “पु. ल. देशपांडे उद्यानात हजारो लोक फिरणे, व्यायामासाठी येतात. त्यांना पुलकप्याऊच्या माध्यमातून शुद्ध व थंडगार पाणी उपलब्ध होईल,’ असे सांगत आरएमडी फाउंडेशनचे आभार मानले. याप्रसंगी जैन महिला जागृती मंच शाखा पुणे अध्यक्षा वैजयंती शहा, ज्योत्स्ना जैन, मंजू शहा, उज्वला शहा, आभा मेहता, सुवर्णा शहा, ममता शहा, कल्पना मेहता, छाया गांधी, मनीषा शहा, सोनम गांधी, पद्मा शहा, त्रिशला पाटील, रेखा जैन, वीरकुमार शहा इत्यादी उपस्थित होते.