दुबई – गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात दुर्मिळ ब्लॅक डायमंड म्हणून नोंद झालेल्या हिऱ्याची लिलावाद्वारे विक्री केली जाणार असून फक्त बीटकॉइनच्या माध्यमातून हा हिरा खरेदी केला जाऊ शकणार आहे.
तज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजाप्रमाणे बीटकॉइनच्या मूल्यामध्ये किमान 55 कोटी रुपयांपर्यंत या हिऱ्याला बोली लागेल अशी शक्यता आहे. 555.55 कॅरेटचा हा ब्लॅक डायमंड एनिग्मा या नावाने ओळखला जातो. दुबईमधील सोथबी लिलावाच्या केंद्रामध्ये सोमवारी या ब्लॅक डायमंडचे प्रथमच प्रदर्शन करण्यात आले आणि हा हिरा विक्रीसाठी खुला करण्यात आला.
सुमारे अडीचशे कोटी वर्षापूर्वी एखादा उल्कापिंड जेव्हा पृथ्वीवर येऊन थडकला होता तेव्हा हा हिरा निर्माण झाला असावा अशी माहिती आहे. आत्तापर्यंत हा हिरा ज्याच्याकडे आहे त्या संग्रहकाचे नाव घोषित करण्यासाठी गेल्या वीस वर्षात प्रथमच हा हिरा विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.
फेब्रुवारीमध्ये या हिऱ्याची ऑनलाइन लिलावाने विक्री होण्यापूर्वी हा लिलाव लंडन आणि लॉस एंजल्स येथेसुद्धा प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. 2006 मध्ये या अद्भुत ब्लॅक डायमंडचा समावेश गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आला होता.