पुणे – बुद्धिबळ क्रीडा ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित अखिल भारतीय खुल्या रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत देशभरांतून एकूण 236 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे.
ही स्पर्धा अश्वमेध हॉल, पुणे येथे आजपासून 14 नोव्हेंबरपर्यंत होणार आहे, असे बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टचे ट्रस्टी प्रकाश कुंटे यांनी सांगितले.
ही स्पर्धा फिडे, एआयसीएफ, एमसीए आणि पीडीसीसी यांच्या मान्यतेखाली होत असून कोविडबाबतची सर्व काळजी या स्पर्धेदरम्यान घेणार येणार आहे. ही स्पर्धा स्विस लीग पद्धतीने 9 फेऱ्यांमध्ये खेळविण्यात येणार आहे.
स्पर्धेत एकूण 2 लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येणार असून यामध्ये विजेत्याला 50 हजार रुपये, उपविजेत्याला 30 हजार रुपये, तिसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूला 20 हजार रुपये, चौथ्या क्रमांकाच्या खेळाडूला 10 हजार रुपये आणि पाचव्या क्रमांकाच्या खेळाडूला 7 हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.