मुंबई – डीसीपीडीएल कंपनीत 52 टक्के शेअर्स असलेल्या किरण कुमार, इंदरमल रामाणी आणि सीआय युनिटच्या पोलीस अधिकाऱ्यांनी परमबीरसिंग यांच्या इशाऱ्यावरून माझ्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करून खंडणी वसुली करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप मुंबईतील प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाबरिया यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केला आहे.
यामुळे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सीआय युनिटमधील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे, तपास अधिकारी रियाझ काझी यांनी माझी व माझ्या कुटुंबियांची मालमत्ता आणि व्यवसाय हडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही छाबरिया यांनी केला.
2015मध्ये मी डीसी अवंती स्पोर्टस कार डिझाईन करून बाजारात आणली. त्यावेळी किरणकुमार नावाची व्यक्ती मला भेटली. त्याने मला आपली ओळख उद्योजक म्हणून करून देत माझ्या कंपनीत गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले.
त्याने गुंतवणूक केल्यावर तो लबाड असल्याचे आमच्या लक्षात आले. माझ्या कंपनीत मी स्वतः 60 कोटी रुपये गुंतविले होते. मात्र, कंपनीतील अधिकांश भागीदार कंपनीच्या व्यवस्थापन आणि प्रत्यक्ष कार्यात सहकार्य करत नव्हते, असेही छाब्रिया यांनी सांगितले.
यासंदर्भात 12 नोव्हेंबर 2020 रोजी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडेही तक्रार केली. मात्र, सर्व गुन्ह्यातून मोठ्या हुशारीने नामनिराळे राहून इंदरमलने किरणकुमारविरुद्ध तक्रार दाखल केली. इंदरमल रामाणीला माझ्याकडून पैसा उकळण्यात अपयश आल्यामुळेच त्याने परमबीर सिंह यांच्या मदतीने माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करून मला अटक करायला लावल्याचे छाब्रिया यांनी स्पष्ट केले.