पद आणि पंख

श्रीराम साधनेसाठी जंगलात गेले होते. सीतामाई कुटीत होत्या. लक्ष्मण द्वारपाल होऊन सीतामाईंचे रक्षण करत होता. डाव कसा साधावा हे रावणाला कळत नव्हते. लक्ष्मण जोवर राखण करतो आहे तोवर आपण सीतेचे हरण करू शकणार नाही याची रावणाला पूर्ण जाणीव होती. काय करावे हे रावणाला कळत नव्हते. मारीच हा रावणाचा हस्तक. त्याने कांचन मृगाचे रूप धारण केले. सीतेची दृष्टी त्याच्यावर पडताच सीतेला मोह झाला. तिने लक्ष्मणाला ते हरीण पकडण्यासाठी पाठविले. लक्षुमणाने सीतेच्या रक्षणासाठी एक रेषा आखली आणि काहीही झाले तरी त्या रेषेबाहेर न येण्याविषयी बजावले. पहाऱ्यावरचा लक्ष्मण दूर गेलेला पाहताच संन्याश्‍याचे रूप घेऊन रावण पुढे आला. याचक होऊन दारी आलेल्या रावणाने सीतेला लक्ष्मण रेषा ओलंडण्यास भाग पाडले. आणि सीतेचे हरण केले.

जंगलातले पशु पक्षी ते दृश्‍य पहात होते. सीतेची रावणाच्या तावडीतून सुटका करावी असे प्रत्येकाला वाटत होते. पण महापराक्रमी रावणाला आपण कसे आडवणार? म्हणून सगळेच पशुपक्षी केवळ भयभीत होऊन ते दृश्‍य पहात राहिले. जटायू पक्षांचा राजा होता. श्रीरामांचा परमभक्त होता. त्याने सीतेचा आक्रोश ऐकला. तो रावणावर चाल करून गेला. पंखाच्या एका फाटकाऱ्यासरशी रावणाचा मायावी रथ उलथापालथा केला. रावणाच्या बाहूंवर चोचीने प्रहार केले. रावणाने जटायूची सगळी शक्ती पंखात आहे हे ओळखले. हे पंखंच छाटले तर हा जटायू काहीही करू शकणार नाही. एखाद्या सामान्य सरपटणाऱ्या जिवासारखी अवस्था होईल याची. असा विचार रावणाच्या मनात आला. त्याने तलवार उपसली. आणि जटायूचा पंख छाटला. जटायू जमिनीवर कोसळला. आपण सीतामाईला वाचवू शकलो नाही या दुःखावेगाने तो अश्रू ढाळू लागला. पंख नसलेला जटायू. किती भयानक कल्पना ही.

कावळ्याने चिमणीशी आभाळात उंचावर जाण्याची स्पर्धा लावली. चिमणीच ती. चिमणी एवढाच तिचा जीव. चिमणी एवढेच पंख. ती शक्‍य होते तोवर, पंख फडकावत राहिली. शेवटी हताश होऊन धापा टाकत फांदीवर विसावली. कावळा अभिमानाने आभाळात उडत राहिला. त्याने उंचावर उडणारी घार पाहिली. घारीहून उंच जाण्यासाठी कावळ्याने भरारी घेतली. कावळा घारीहून उंच गेला. घारच ती. तिने एकदाच पंख फडकावले. कावळ्याहून कितीतरी उंच गेली. कावळ्याने पुन्हा त्वेषाने पंख फडकावले. पुन्हा घारीहून उंच गेला. घारीने हसून कावळ्याकडे पाहिले. पुन्हा पंख फडकावले. आणखी उंच झेप घेतली. पार ढगांना स्पर्श केला. घार ढगात दिसेनाशी झाली. कावळ्याने पुन्हा पंखाची फडफड केली. पण पंखातले त्राण संपले होते. पंखातून हवा गळावीतसा कावळा खाली आला. धापा टाकत चिमणीच्या समोर विसावला.

मागे मी असेच एका पक्षाविषयी वाचले होते. वृद्धापकाळ जवळ आला, भक्ष पकडणे असह्य झाले, अंतकाळ दिसू लागला कि तो पक्षी स्वतःचे पंख स्वतःच उपसून काढतो आणि स्वतःला मृत्यूच्या स्वाधीन करतो. पंखाशिवाय पाखरांना शोभा नाही आणि पदाशिवाय माणसाला. परवा एका मित्रासोबत एका गृहस्थांच्या घरी गेलो होतो. डिवायएसपी, कलेक्‍टर अशी पदं भूषविलेली विभिन्न माणसं एकत्र बसली होती. सेवानिवृत्त झालेली. साध्यासुध्या कपड्यात खुर्च्यात विराजमान झाली होती. कधी काळी आपण डिवायएसपी होतो. कलेक्‍टर होतो याचे चेहऱ्यावरचे रंग पुसट रंग झाले होते. तरीही जुन्या आठवणीघासून पुसून,त्या पदातला रुबाबलखलखीत केला जात होता.

पदावर असताना भयंकर मुजोरी असणारे कितीतरी अधिकारी मी पहिले आहेत. सरकारी खात्यातल्या शिपायाला सुद्धा आपण कोणीतरी फार मोठे अधिकाऱ्याची असल्याचा साक्षात्कार होत असतो. आणि वेळप्रसंग पाहून तो लोकांचे नाकतोंड दाबण्याचा प्रयत्न करत असतो. चिरीमिरी घेत असतो. अधिकाराचे पंख धारण केलेल्या पोलिसालाही साहेब म्हणूनच साद घालावी लागते. राजकीय पुढाऱ्यांचे तर काही विचारूच नका. या देशाचे स्वामित्व हक्क आपल्याला मिळाले आहेत. आणि या देशाची सगळी व्यवस्था केवळ आपल्या दिमतीसाठी आहे अशाच अविर्भावात ते वागत असतात. पण पद गेल्यावर त्यांची अवस्था दात काढलेल्या सापासारखी होते. चावा तर घेता येत नाहीच आणि चावा घेतला तरी काही उपयोग होत नाही.

खरंतर पद, प्रतिष्ठा, अधिकार हे आपण धारण केलेले पंख असतात. कधी ना कधी ते उतरवून ठेवण्याची वेळ येणार असते. कधी ना कधी त्यांचा त्याग करावाच लागणार असतो. याची प्रत्येकालाजाणीव असते. तरीही माणूस त्या पदाचा, अधिकाराचा एवढा अहंकार का बाळगतो? कसली ऐट असते माणसाला एवढी? कितीही कमावले तरी सोबत नेता येत नाही. मिळवलेले सुख सुद्धा दाखवता येत नाही. दाखवता येते ते फक्त ऐश्वर्यआणि पदाची मिजास. पण पद गेलं कि त्या ऐश्वर्याच्या केवळ खुणा उरतात. आयाळ झडलेल्या सिंहासारखी अवस्था होते माणसाची. देह जळून राख होतो तेव्हा त्या रक्षेत ना ऐश्वर्याच्या खुणा सापडतात ना सुखाच्या. मग आपल्या पदाचा टेंभा का मिरवतो माणूस? पदाचा उपयोग लोककल्याणासाठी का नाही करत? का भोवतीच्या लोकांना कस्पटासमान वागवतो?

पुराणातल्या जटायूचा लोकांना विसर पडत नाही. हजारो वर्षाचा काळ गेला पण जटायू चिरंतन आहे. छत्रपतींच्या गडाचे चिरे निखळले असतीलपण त्यांच्या शौर्याच्या कथा काळालाही पुसता आल्या नाहीत. वर्षानुवर्षे लोटली तरी शिवरायांच्या पराक्रमाचं गारुड आपल्याला भुरळ घालतं आहे. महात्मा ज्योतिबा फुले,विनायक दामोदर सावरकर हि तर अगदी अलीकडची नावं. पण त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा पुसणे काळाला कधीही जमणार नाही. कारण त्यांच्या पदाचा त्यांना गर्व नव्हता. आपलं आयुष्य,आपल्या कर्तृत्वाचे पंख आपल्यासाठी नसून जनतेसाठी आहेत. आपल्या कर्तृत्वाची भरारी जनतेसाठी. आपले पंख जनतेला उब देण्यासाठी.पदापेक्षा कर्तृत्वाचे, लोकसेवेचे पंख अधिक मजबूत असतात. प्रत्येकाने आपल्या पदाचा उपयोग जनहितासाठी केला, प्रत्येकाने आपल्या पंखाचा वापर इतरांना उब देण्यासाठी केला तर हे जग सुखी व्हायला फारसा अवधी लागणार.

– विजय शेंडगे

Leave A Reply

Your email address will not be published.