Tanmay Agarwal In Ranji Trophy 2024 : हैदराबादचा सलामीवीर तन्मय अग्रवालचा मॅरेथॉन डाव 366 धावांवर संपुष्टात आला. प्रथम श्रेणी क्रिकेटच्या एका डावात सर्वाधिक धावा करणारा तो तिसरा भारतीय ठरला. बीबी निंबाळकर (443*) आणि पृथ्वी शॉ (379) यांनी भारतासाठी लाल चेंडू क्रिकेटमध्ये तन्मयपेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
तन्मयचा डाव अरुणाचल प्रदेशचा गोलंदाज नबाम टेम्पोलने संपुष्टात आणला. बाद होण्यापूर्वी त्याने आपल्या डावात 34 चौकार आणि 26 गगनचुंबी षटकारांसह अनेक विक्रम नावावर केले. अग्रवालने 2017 मध्ये पूर्व प्रांताविरुद्ध बॉर्डरसाठी 191 चेंडूत 300 धावा करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या मार्को माराइसचा विक्रम मोडला. तसेच त्याने माजी भारतीय कर्णधार रवी शास्त्री यांचा 119 चेंडूत 200 धावांचा टप्पा गाठून भारतीयाकडून सर्वात जलद प्रथम श्रेणी द्विशतक झळकावण्याचा 39 वर्षांचा विक्रमही मोडला. हे प्रथम श्रेणीतील दुसरे सर्वात वेगवान द्विशतक देखील होते.
तन्मय अग्रवालने केलेल्या विक्रमांवर एक नजर टाकूया…
1. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये भारतासाठी एका डावात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज-
बीबी निंबाळकर 443* (MAH v KAT)
पृथ्वी शॉ 379 (MUM v ASS)
तन्मय अग्रवाल 366 (HYD v ARP)
प्रथम श्रेणी क्रिकेटच्या एका डावात सर्वाधिक षटकार-
तन्मय अग्रवाल- 26
कॉलिन मुनरो-23
प्रथम श्रेणी क्रिकेटच्या एका सामन्यात सर्वाधिक षटकार-
तन्मय अग्रवाल- 26
शफीकुल्ला शिनवारी- 24
रणजी ट्रॉफीच्या एका डावात चौकारानं सर्वाधिक धावा –
292 – तन्मय अग्रवाल (हैदराबाद) विरुद्ध अरुणाचल, 2024
236 – साकीबुल गनी (बिहार) विरुद्ध मिझोराम, 2022
228 – केदार जाधव (महाराष्ट्र) विरुद्ध यूपी, 2012
222 – संजय मांजरेकर (मुंबई) विरुद्ध हैदराबाद, 1991
222 – ऋषभ पंत (दिल्ली) विरुद्ध महाराष्ट्र, 2016
याशिवाय, तन्मयने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 300 धावा (147 चेंडू), प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये भारतीयाकडून सर्वात जलद 200 धावा (119 चेंडू), आणि रणजी ट्राफीच्या एका डावात सर्वाधिक चौकार (34) आणि षटकार (26) हे सर्व विक्रम आपल्या नावावर केले. तसेच तन्मय अग्रवाल हा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 200+ स्ट्राइक रेटसह तिहेरी शतक झळकावणारा पहिला खेळाडू आहे.
हैदराबादने डाव केला घोषित…
तन्मय अग्रवालच्या या खेळीच्या जोरावर हैदराबादने अरुणाचल प्रदेशच्या 172 धावांच्या पुढे 4 विकेट गमावून 615 धावा करून पहिला डाव घोषित केला आहे. तन्मयशिवाय हैदराबादचा कर्णधार राहुल सिंग गेहलोतने 105 चेंडूत 185 धावांची तुफानी खेळी केली.