Tanmay Agarwal In Ranji Trophy 2024 : सध्या खेळल्या जात असलेल्या रणजी ट्रॉफीमध्ये अरुणाचल प्रदेशचा तन्मय अग्रवाल वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ब्रायन लाराचा 501* धावांचा विक्रम मोडण्याच्या जवळ आला आहे. हैदराबाद विरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात तन्मयने 160 चेंडूत 21 षटकारांच्या मदतीने 323* धावा केल्या आहेत. या खेळीमुळे तन्मय प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात जलद त्रिशतक झळकावणारा खेळाडू ठरला. त्याने अवघ्या 147 चेंडूत 300 धावांचा टप्पा गाठला.
केवळ तिहेरीच नाही तर तन्मय प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात जलद द्विशतक झळकावणारा खेळाडूही ठरला. त्याने अवघ्या 119 चेंडूत आपले द्विशतक पूर्ण केले होते. आतापर्यंत 21 षटकार ठोकणाऱ्या तन्मयने रणजी ट्रॉफीच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही केला आहे.
तन्मय अग्रवालने 2017 मध्ये पूर्व प्रांताविरुद्ध 191 चेंडूत त्रिशतक पूर्ण करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या मार्को माराइसचा विक्रम मोडला. तसेच तन्मय हा रणजी ट्रॉफी सामन्याच्या एका डावात सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी रणजी ट्रॉफीच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम इशान किशन (14) आणि शक्ती सिंग (14) यांच्या नावावर होता.
HISTORY BY HYDERABAD’S TANMAY AGARWAL…!!! 🤯
A triple century in a Ranji Trophy match in just 147 balls with 20 sixes. An absolute onslaught by Tanmay against Arunachal Pradesh. pic.twitter.com/YHxGw4Yr3X
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 26, 2024
अरुणाचल प्रदेश आणि हैदराबाद यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्याच्या पहिल्याच दिवशी तन्मयने सर्वात वेगवान त्रिशतक झळकावण्याचा पराक्रम केला. दिवसअखेर त्याने 323 धावांपर्यंत मजल मारली होती. सलामीला खेळताना तन्मयने ही शानदार खेळी खेळली, ज्यामध्ये कर्णधार गेहलोत राहुल सिंगने त्याला चांगली साथ दिली. अरुणाचलच्या कर्णधाराने 105 चेंडूत 26 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 185 धावांची खेळी केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 345 धावांची भागीदारी केली.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अरुणाचल प्रदेश संघाने पहिल्या दिवसअखेर 1 बाद 529 धावा केल्या आहेत. अभिरथ रेड्डी दिवसाच्या अखेरपर्यंत तन्मयसह क्रीजवर उपस्थित आहे. अभिरथने 24 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 19* धावा केल्या आहेत.
ब्रायन लाराचा विक्रम मोडण्याच्या जवळ…
प्रथम श्रेणीत सर्वाधिक वैयक्तिक धावा करण्याचा विक्रम ब्रायन लाराच्या नावावर आहे. लाराने प्रथम श्रेणीत 501* धावा केल्या होत्या. आता अरुणाचल प्रदेशचा तन्मय हा विक्रम मोडू शकतो. तन्मय ज्या वेगाने फलंदाजी करत आहे, ते पाहता तो दुसऱ्या दिवशी अवघ्या काही चेंडूंमध्ये लाराचा विक्रम मोडेल, असे वाटते.