मंचर -आंबेगाव तालुक्यातील रांजणी येथे पोलीस पाटील आणि त्यांच्या मुलाच्या विरोधात खंडणीचा गुन्हा तर सरपंच आणि इतर पाच जणांच्या विरोधात ऍट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. एकूण आठ जणांच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी सांगितले.
6 मे रोजी रांजणी येथील नरसिंह देवस्थानाच्या सभामंडपात सरपंच भगवान महादू वाघ, ऋतिक बंडेश वाघ या दोघांनी काहीही कारण नसताना प्रशांत सोनवणे याला जातीवचक शब्द वापरून तुला गावातून काढून टाकणार आहे, अशी शिवीगाळ व दमदाटी केली. 11 जून रोजी गणेश निवृत्ती वाघ, तेजस लक्ष्मण भोर, योगेश बाळासाहेब भोर, महादू बाबुराव भोर (रा. रांजणी) यांनी मागील राग मनात धरून जातीवाचक शब्द वापरून तुला लवकर खपवून टाकू. अशी दमदाटी केल्याप्रकरणी संबधितांविरोधात प्रशांत सोनवणे यांनी फिर्याद 16 जून रोजी दिली आहे.
9 जून रोजी दगडु आप्पा औटी (रा. रांजणी) यांच्याविरोधात दिपक खुडे यांनी पोलीस ठाण्याला दिलेला ऍट्रासिटी तक्रारी अर्ज मिटवण्यासाठी काही एक संबध नसताना रांजणी गावचे पोलीस पाटील रोहिदास सोनवणे आणि त्यांचा मुलगा प्रशांत सोनवणे यांनी 35 हजार रुपयांची खंडणी मागितली होती. त्यानुसार गणेश वाघ यांच्या गाडीवर ड्रायव्हर असलेले दगडु औटी यांच्यासाठी गणेश वाघ यांनी 10 हजार रुपये पोलीस पाटील रोहिदास सोनवणे यांना दिले आहेत.
उर्वरीत 25 हजार रुपये दिले नाही तर ऍट्रासिटी गुन्हा दाखल करेल, अशी धमकी दिल्याप्रकरणी पोलीस पाटील रोहिदास सोनवणे आणि मुलगा प्रशांत सोनवणे यांच्या विरोधात दगडु औटी यांनी बुधवारी (दि. 17) फिर्याद दिली आहे. पुढील तपास मंचर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अर्जुन शिंदे करीत आहेत.