मुंबई – बॉलीवूडमधील अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. ही जोडी लवकरच एका चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दिग्दर्शक लव रंजन यांच्या लव फिल्म्स या प्रोडक्शन हाऊसने सोशल मीडियावर पोस्ट करत या चित्रपटाबद्दल माहिती दिली आहे.
लव फिल्म्सने सोशल मीडियावर पोस्ट केली, लव रंजन यांनी दिग्दर्शन केलेला बहुचर्चित चित्रपट 26 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तसेच अभिनेत्री डिंपल कपाडिया या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत.
या चित्रपटाच्या नावाबाबत अजून कोणतीही घोषणा लव फिल्म्सने केली नाही, पण चित्रपटात रणबीर आणि श्रद्धा पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करत असल्याने प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहात आहेत.
लव रंजन यांनी “प्यार का पंचनामा’ आणि “सोनू की टीटू की स्विटी’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. तसेच लव यांच्या या आगामी चित्रपटाबरोबरच रणबीरचा ब्रह्मास्त्र चित्रपटदेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.