मुंबई : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मागासवर्गीय विकास मंडळाच्या सुमारे 130 कोटीच्या घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले आणि आगामी विधानसभा निवडणुकीत मोहोळ मतदारसंघातून अपक्ष लढण्याची तयारी करणारे आमदार रमेश कदम यांना उच्च न्यायालयाने आज चार दिवसाचा जामीन मंजूर केला. 2015 मध्ये आर्थिक घोटाळ्या प्रकरणात अटक झाल्यापासून चार दिवसाचा जामीन मिळाला आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मागासवर्गीय विकास मंडळाला देण्यात आलेला सुमारे 130 कोटीचा निधी मंडळाचे अध्यक्ष या नात्याने रमेश कदम यांनी परस्पर आपल्या खात्यात वळवून भ्रष्टाचार केल्याच्या आरोप आहे. सीआयडीेने ऑगस्ट 2015 मध्ये अटक केल्यापासून ते कारागृहातच आहेत. ईडी कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला असला तरी सीआयडीने दाखल केलेली प्रकरणे प्रलंबित असल्याने कदम यांनी हायकोर्टात जामिनासाठी याचिका दाखल केली होती. त्या अर्जावर आज झाली.
यावेळी कदम यांच्या अर्जाला राज्य सरकारने जोरदार विरोध केला. अटक केल्यापासून कदम सातत्याने चर्चेत राहिले आहेत.एका व्हिडिओमध्ये कदम आर्थर रोड जेलमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना शिवीगाळ करत असल्याचे दिसले होते, त्यासंदर्भात रमेश कदम यांच्याविरोधात नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडीत रमेश कदम यांचे बेशस्त वर्तन हे वारंवार समोर आले आहे. पोलीस बंदोबस्तात विधानभवनात आलेल्या कदमांनी जाहीरपणे भाजपला पाठींबा देत गदारोळ निर्माण केला होता. त्यामुळे त्यांना बाहेर सोडल्यामुळे या आर्थिक घोटाळ्याच्या तपासावर आणि यातील साक्षीदारांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो, असा दावा केला. तर आगामी निवडणुकीला मोहोळ मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जामीन द्यावा, अशी विनंती कदम यांनी केली. ती न्यायालयाने मान्य करत 3 ते 5 ऑक्टोबर अशा केवळ चार दिवसांचा जामीन मंजूर केला आहे.