Ayodhya Ram Mandir : अयोध्येत भगवान श्री रामाचे भव्य मंदिर उभारले जात आहे. रामललाच्या अभिषेकाची रूपरेषा निश्चित करण्यात आली असून, मुख्य अभिषेक सोहळा 22 जानेवारी रोजी होणार आहे. परंतु 15 जानेवारीपासूनच पूजा आणि विधी यासारखे कार्यक्रम सुरु झाले आहेत. 22 जानेवारी रोजी दुपारी प्रभू श्री रामाच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होणार आहे.
22 जानेवारी 2024 रोजी सकाळी 12.29 ते 12:30 पर्यंत राम मंदिरात राम लल्लाची मूर्ती स्थापन करण्याची वेळ असेल. प्राणप्रतिष्ठेसाठी केवळ 84 सेकंदांचा शुभ मुहूर्त असेल. पण प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या निमित्ताने राम मंदिर 20 आणि 21 जानेवारीला बंद राहणार असल्याची बातमी समोर आली आहे. राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी याबाबत माहिती दिली आहे.
22 जानेवारी रोजी राम मंदिराच्या गर्भगृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामललाच्या मूर्तीचे अभिषेक करण्यात येणार आहे. या दिवशी अयोध्येत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्राणप्रतिष्ठा दरम्यान, राम मंदिराच्या गर्भगृहात केवळ पाच लोक उपस्थित राहणार आहेत, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख यजमान असतील.
तसेच, RSS प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचा समावेश असेल. त्यामुळे इतर लोकांना या दिवशी सुरक्षेच्या कारणास्तव राम मंदिरात प्रवेश करता येणार नाही. अयोध्येला सध्या छावणीचे स्वरुप आले आहे. अयोध्येतील सर्व बुकिंग सध्या रद्द करण्यात आले आहेत. मात्र, 23 जानेवारीपासून सर्व सामान्य भाविकांना राम मंदिरात प्रभू श्रीरामाचे दर्शन घेता येणार आहे.