West Indies in Australia, 1st Test Results : ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळली जाणारी अॅडलेड कसोटी अडीच दिवसही टिकू शकली नाही. या सामन्याचा निकाल तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच लागला. वास्तविक, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत वेस्ट इंडिज पराभवाच्या उंबरठ्यावर होता. पण अपूर्ण राहिलेले काम ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या काही षटकांत पूर्ण केले.
या सामन्याच्या पहिल्या डावात वेस्ट इंडिजचा संघ 188 धावांत आटोपला. त्यानंतर प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 283 धावा केल्या आणि पहिल्या डावाच्या आधारे 95 धावांची आघाडी घेतली. नंतर, वेस्ट इंडिजचा दुसरा डाव केवळ 120 धावांवरच मर्यादित राहिला. येथे ऑस्ट्रेलियाला 26 धावांचे लक्ष्य मिळाले जे त्यांनी एकही विकेट न गमावता पूर्ण केले.
A 10-wicket win to start the series! Wrapped up before lunch on day three #AUSvWI
— cricket.com.au (@cricketcomau) January 19, 2024
पदार्पणाच्या कसोटीत शमर जोसेफचे 5 बळी…
सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियन कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्सच्या 4-4 विकेट्समुळे वेस्ट इंडिजचा संघ केवळ 188 धावांवर आटोपला. त्याच दिवशी ऑस्ट्रेलियानेही 59 धावांवर दोन विकेट्स गमावल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा वेस्ट इंडिजने चांगले पुनरागमन केले. शमर जोसेफच्या 5 विकेट्समुळे ऑस्ट्रेलियन संघही मोठी आघाडी घेऊ शकला नाही आणि 283 धावांवर सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियासाठी ट्रॅव्हिस हेडने अप्रतिम शतकी खेळी करताना सर्वाधिक 119 धावांची खेळी केली.
हेझलवुड चा कहर…
इथपर्यंत हा सामना चांगलाच रंगला होता पण दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजची फलंदाजी पत्त्याच्या घरासारखी कोसळली. दिवसाचा खेळ संपेपर्यंत वेस्ट इंडिज संघाने अवघ्या 73 धावांत 6 विकेट गमावल्या होत्या. उर्वरित चार विकेट तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच पडल्या.
कर्क मॅकेन्झी (26) आणि जस्टिन ग्रीव्ह्ज (24) यांच्याशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला विंडीजच्या दुसऱ्या डावात 20 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. पाहुण्या संघाला या डावात केवळ 120 धावा करता आल्या. येथे जोश हेझलवूडने 5 विकेट घेतल्या.
हेड ठरला सामनावीर…
ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 26 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे सहज साध्य झाले. मात्र, यादरम्यान उस्मान ख्वाजा दुखापतग्रस्त झाला आणि नऊ धावा केल्यानंतर ख्वाजा रिटायर्ड हर्ट झाला. स्टीव्ह स्मिथ 11 धावा करून नाबाद राहिला तर लॅबुशेन एका धावेवर नाबाद राहिला. पहिल्या डावातील शतकासाठी ट्रॅव्हिस हेडला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता दुसरी कसोटी 25 जानेवारीपासून ब्रिस्बेनमध्ये खेळवली जाणार आहे.
अन् 85 वर्षांपूर्वीच्या विक्रमाची केली बरोबरी….
या सामन्यात वेस्ट इंडिजचा नवोदित वेगवान गोलंदाज शमर जोसेफने इतिहास रचला. त्याने आपल्या पदार्पणाच्या कसोटीतील पहिल्याच चेंडूवर स्टीव्ह स्मिथला स्लिपमध्ये झेलबाद करून पहिल्या बळीची नोंद केली. तो कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा जगातील 23 वा तर वेस्ट इंडिजचा दुसरा गोलंदाज ठरला. जोसेफच्या आधी 1939 मध्ये विंडिजकडून पदार्पण करताना टायरेल जॉन्सन यांनी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर वॉल्टर कीटन यांना बाद केले होते.