Eknath Shinde : अयोध्येत भगवान श्री रामाचे भव्य मंदिर उभारले जात आहे. रामललाच्या अभिषेकाची रूपरेषा निश्चित करण्यात आली आहे. मुख्य अभिषेक सोहळा 22 जानेवारी रोजी होणार आहे, परंतु 15 जानेवारीपासूनच पूजा आणि विधी यासारखे कार्यक्रम सुरु होतील. 22 जानेवारी रोजी दुपारी प्रभू श्री रामाच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होणार आहे.
प्राणप्रतिष्ठा दरम्यान, राम मंदिराच्या गर्भगृहात केवळ पाच लोक उपस्थित राहणार आहेत, ज्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख यजमान असतील. तसेच, RSS प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचा समावेश असेल.
22 जानेवारी 2024 रोजी सकाळी 12.29 ते 12:30 पर्यंत राम मंदिरात राम लल्लाची मूर्ती स्थापन करण्याची वेळ असेल. प्राणप्रतिष्ठेसाठी केवळ 84 सेकंदांचा शुभ मुहूर्त असेल. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अनेक दिग्गज कलाकार आणि नेते मंडळी यांना देखील आमत्रंण देण्यात आलं असून, या सोहळ्यासाठी अयोध्येत जय्यत तयारी सुरू आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातून एकूण 800 हून अधिकांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. त्यात 534 विशेष निमंत्रित असून उद्योग, कला, क्रीडा, तसेच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा समावेश आहे. विशेष म्हणजे या व्यक्तींमध्ये आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही अयोध्येतील सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार होताना पाहणार.. अयोध्येला जाणार !!
अयोध्येतील श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा येत्या २२ जानेवारी रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. शिवसेनेचा मुख्य नेता म्हणून आज या… pic.twitter.com/IamNHekf3m
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 8, 2024
‘वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार होताना पाहणार.. अयोध्येला जाणार ! असं कॅप्शन देत शिंदेंनी एक फोटोही ट्वीट केला आहे. तर अयोध्येतील श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा येत्या 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. शिवसेनेचा मुख्य नेता म्हणून आज या सोहळ्याचे आमंत्रण मला देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.