Ayodhya Ram Mandir : अयोध्येत भगवान श्री रामाचे भव्य मंदिर उभारले जात आहे. रामललाच्या अभिषेकाची रूपरेषा निश्चित करण्यात आली असून, मुख्य अभिषेक सोहळा 22 जानेवारी रोजी होणार आहे. परंतु 15 जानेवारीपासूनच पूजा आणि विधी यासारखे कार्यक्रम सुरु झाले आहेत. 22 जानेवारी रोजी दुपारी प्रभू श्री रामाच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होणार आहे.
प्राणप्रतिष्ठा दरम्यान, राम मंदिराच्या गर्भगृहात केवळ पाच लोक उपस्थित राहणार आहेत, ज्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख यजमान असतील. तसेच, RSS प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचा समावेश असेल.
22 जानेवारी 2024 रोजी सकाळी 12.29 ते 12:30 पर्यंत राम मंदिरात राम लल्लाची मूर्ती स्थापन करण्याची वेळ असेल. प्राणप्रतिष्ठेसाठी केवळ 84 सेकंदांचा शुभ मुहूर्त असेल. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अनेक दिग्गज कलाकार आणि नेते मंडळी यांना देखील आमत्रंण देण्यात आलं असून, ‘रामायण’ फेम अभिनेते अरुण गोविल देखील यावेळी उपस्थित असणार आहेत.
अश्यातच आज अयोध्येत मालिकेत राम, सीता आणि लक्ष्मणाची भूमिका साकारणारे कलाकार म्हणजेच ‘अरुण गोविल, दीपिका चिखलिया आणि सुनील लहरी’ यांचं अयोध्येत जंगी स्वागत करण्यात आलं. त्यांच्या स्वागताचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. आज हे कलाकार अयोध्येत दाखल झाले असून, यावेळी मोठ्या उत्साहात त्यांचं स्वागत केलं गेलं.
View this post on Instagram
यावेळी सीतेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी लाल रंगाची साडी नेसली आहे. तर अरुण गोविल आणि सुनील लहरी हे पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या कुर्ता-पायजमामध्ये दिसत आहेत. या तिघांभोवती लोकांची बरीच गर्दी पहायला मिळतेय. काहींनी हातात झेंडेसुद्धा घेतले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.
अयोध्येत अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया यांच्यासोबत पाहून चाहतेसुद्धा खुश झाले आहेत. बऱ्याच वर्षांनंतर प्रेक्षकांना हे तीन दिग्गज कलाकार एकत्र पहायला मिळत आहेत. रामायण या मालिकेची प्रचंड लोकप्रियता आहे. लॉकडाऊनच्या काळात ही मालिका पुन्हा एकदा टीव्हीवर प्रसारित करण्यात आली होती. त्यावेळी मालिकेतील कलाकार पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले होते.