रालोआ ही कोणत्या एका पक्षाची खासगी मालमत्ता नाही- संजय राऊत

संजय राऊत यांची आता दिल्लीतून भाजपवर निशाणेबाजी

नवी दिल्ली: शिवसेनेला कोणाच्या सहीने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर काढण्यात आले असा सवाल उपस्थित करीत रालोआ ही काही कोणा एका राजकीय पक्षाची खासगी मालमत्ता नाही अशा शब्दात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज भाजपवर निशाणा साधला आहे. हिवाळी अधिवेशनासाठी राऊत हे सध्या दिल्लीत आले असून त्यांनी आज संसदेच्या आवारात तसेच विविध वाहिन्यांशी बोलताना भाजपवर हा निशाणा साधला. काही लोक स्वत:ला ईश्‍वरच समजायला लागले आहेत अशी टिपण्णीही त्यांनी भाजपच्या ज्येष्ठांना उद्देशून केली आहे.

त्यांनी म्हटले आहे की रालोआ या आघाडीचा संस्थापक पक्ष म्हणून शिवसेनेचे स्थान आहे. या आघाडीत निमंत्रक म्हणूनही एक पद आहे. जॉर्ज फर्नांडिस या पदावर काम करीत असत, पण आता एनडीएचे निमंत्रक कोण आहेत. आणि कोणाच्या सहीने तेथे निर्णय होतात असा सवाल त्यांनी उपस्थित केला. रालोआत लोकशाही पाळली पाहिजे. येथे कोणी स्वत:ला सर्वेसर्वा समजू नये आणि ही आघाडी कोणाची खासगी मालमत्ता नाही असेही त्यांनी म्हटले आहे. एनडीएचे जे चार प्रमुख पक्ष संस्थापक होते त्यात शिवसेनेचा समावेश होता हे संबंधीतांनी लक्षात घ्यावे असेही त्यांनी म्हटले आहे.

संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल शिवसेना एनडीएत नाही अशी घोषणा केली होती. पण त्यांना त्याचा काय अधिकार आहे असा सवालही राऊत यांनी केला. रालोआत ते नवीन आलेले मंत्री आहेत त्यांना असा कोणताही अधिकार नाही टोलाही राऊत यांनी लगावला. शिवसेनेला आघाडीतून काढण्यापुर्वी प्रकाशसिंग बादल आणि नितीशकुमार यांची भाजपने अनुमती घेतली आहे काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शिवसेनेने एनडीए अनेक वेळा वाचवली आहे. आम्ही त्यांचा हात कधीही सोडला नव्हता. आता त्यांना आपणच ईश्‍वर असल्याचा साक्षात्कार झाला आहे. पण ते ईश्‍वर नाहीत आणि त्यांनी तसे स्वत:ला समजूही नये असे ते भाजपचे नाव न घेता म्हणाले.


डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सरकार

महाराष्ट्रात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सरकार स्थापन होईल असा विश्‍वास राऊत यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला. ते म्हणाले की या संबंधातील चर्चा अजून सुरू आहे. तीन पक्षांमध्ये किमान समान कार्यक्रमही ठरला आहे त्यावर स्वाक्षऱ्याही झाल्या आहेत. शिवसेनेच्या नेतृत्वाखालीच सरकार स्थापन होईल आणि शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल असेही त्यांनी यावेळी निक्षुन सांगितले. तथापी त्यांनीही डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सरकार स्थापन होईल असे स्पष्ट विधान केल्यामुळे सध्या महाराष्ट्रात सरकार स्थापनेची प्रक्रिया लांबली आहे असे संकेत मिळाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.