मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेच्या किशोरी पेडणकर?

मुंबई: मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेकडून किशोरी पेडणेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. तर उपमहापौरपदासाठी ऍड. सुहास वाडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरुन झाल्याचे विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले. शिवसेनेतील अंतर्गत स्पर्धा सोडवण्यासाठी आणि नाराज इच्छुकांची समजूत काढण्यासाठी शिवसेना नेते अनिल परब मुंबई महापालिकेत दाखल झाले. अनिल परब यांच्या उपस्थितीतच किशोरी पेडणेकर यांचा महापौरपदाचा अर्ज दाखल करण्यात आला.

मुंबई महापालिका महापौरपदासाठी खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे मुंबईच्या महापौरपदासाठी अनेक नगरसेवकांनी दावा केला होता. यशवंत जाधव, मंगेश सातमकर, आशिष चेंबुरकर, विशाखा राऊत, शेखर वायंगणकर यांनी महापौरपदासाठी दावा केला होता. मात्र किशोरी पेडणेकर आणि यशवंत जाधव यांची नावे आघाडीवर होती. अखेरच्या क्षणी यशवंत जाधव यांचे नाव पिछाडीवर पडले आणि किशोरी पेडणेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

दरम्यान, मुंबई महापालिकेत महापौरपदासाठी भाजप उमेदवार देणार नाही. मुंबई महापालिकेत भाजप पहारेकरीच्या भूमिकेत कायम राहणार असल्याचे समोर येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.