राखी बांधून घेताना बंदीबांधवांचे डोळे पाणावले; नेत्रदानाविषयी दाखविली उत्सुकता
नगर – राखीचा धागा छोटा असतो पण तो थेट हृदयापर्यंत पोहचतो. हृदय परिवर्तनही करू शकतो त्याचीच प्रचिती आज आली आहे. कैदी बांधवांनी मरणोत्तर नेत्रदानाविषयी दाखविलेली उत्सुकता हे माणुसकीचे लक्षण आहे असे प्रतिपादन नागनाथ सावंत यांनी केले. येथील जिल्हा कारागृहमध्ये रोटरी क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने राखी पौर्णिमेचा सण कैदी बांधवांना राखी बांधून साजरा करण्यात आला व इतर प्रसंगी नेत्रतज्ञ डॉ. सुधा कांकरिया यांनी राखीचे महत्त्व सांगून नेत्रदाना विषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेलर एन. जी. सावंत हे होते, अशी माहिती रोटरीचे अध्यक्ष महावीर मेहेर यांनी दिली.
कारागृहाच्यावतीने श्यामकांत शेंडगे यांनी स्वागत केले. रोटरी क्लबच्या माजी अध्यक्षा डॉ. सुधा कांकरिया, पल्लवी मेहेर, छाया करंजुले, सुनिता कर्नावट यांनी बंदीबांधवांना तिलक, औक्षण करून राखी बांधली त्यावेळेस घरापासून दूर असणाऱ्या बंदीबांधवांच्या डोळयात पाणी आले. त्यांच्या भावना अनावर झाल्या सदर प्रसंगी रोटरीच्या वतीने पुस्तकांचा संच कारागृहातील लायब्ररीसाठी भेट देण्यात आला.
एन जी सावंत, श्यामकांत शेंडगे यांच्या हस्ते रोटरी क्लब ऑफ अ.नगर व साई सूर्य नेत्रसेवा यांनी तयार केलेली नेत्रदान-श्रेष्ठदान या माहितीपत्रकाचे अनावरण करण्यात आले.
या प्रसंगी रोटरीचे माजी अध्यक्ष कौशिक कोठारी, दिलीप कर्नावट हे उपस्थित होते. सदर माहिती पत्रिका वाचून बंदीबांधवानी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला व त्यांनी नेत्रदानाचा संकल्प करण्याविषयी उत्सुकता दाखविली. नेत्रदानाचे फॉर्म आवर्जुन मागुन घेतले. कैदी बांधवांसाठी नेत्रदानाविषयीचा असा उपक्रम घेणारे रोटरी क्लब व साई सूर्य नेत्रेसेवा हे देशातील पहिले संघटन होय असे प्रतिपादन रोटरीचे सचिव दादासाहेब करंजुले यांनी केले.