नवी दिल्ली – संजय सिंह, एन.डी.गुप्ता आणि स्वाती मालीवाल या आपच्या तिन्ही उमेदवारांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली. आपच्या उमेदवारांव्यतिरिक्त इतर कुणीही उमेदवारी अर्ज दाखल केले नाहीत. त्यामुळे दिल्लीतून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या तीन जागांसाठी प्रत्यक्ष निवडणूक घेण्याची वेळ आली नाही.
संजय सिंह, एन.डी.गुप्ता आणि सुशीलकुमार गुप्ता या आपच्या विद्यमान राज्यसभा सदस्यांचा सहा वर्षंचा कार्यकाळ २७ जानेवारीला समाप्त होत आहे. त्यामुळे रिक्त होणाऱ्या जागा भरण्यासाठी निवडणूक आयोगाने १९ जानेवारीला निवडणूक घेण्याचे जाहीर केले. त्यानंतर दिल्लीतील सत्तारूढ आपने सिंह आणि एन.डी.गुप्ता यांना पुन्हा उमेदवारी दिली.
तर, सुशीलकुमार गुप्ता यांच्याऐवजी दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा मालीवाल यांना उमेदवारी देण्यात आली. त्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ९ जानेवारीला समाप्त झाली. इतर कुठल्याच पक्षाच्या एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही.
त्यामुळे आपच्या उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली. त्याविषयीची औपचारिक घोषणा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत शुक्रवारी समाप्त झाल्यानंतर करण्यात आली. सिंह आणि गुप्ता दुसऱ्यांदा राज्यसभा सदस्य बनले आहेत. तर, मालीवाल यांना ती संधी पहिल्यांदाच मिळाली आहे.