नवी दिल्ली-भारत दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे संरक्षण मंत्री मार्क टी.एस्पर यांच्याशी सोमवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यापक चर्चा केली. आता उद्या (मंगळवार) राजनाथ, एस्पर यांच्याबरोबरच परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांची एकत्रित (2+2 मंत्रिस्तरीय) बैठक होणार आहे. त्यावेळी दोन्ही देशांमध्ये महत्वाचा संरक्षणविषयक करार होणार आहे.
एस्पर आणि पॉम्पिओ भारताच्या दोन दिवसीय दौऱ्यासाठी येथे दाखल झाले. त्यानंतर राजनाथ आणि एस्पर यांची बैठक झाली. त्यांच्यात संरक्षण आणि व्यूहात्मक संबंध वाढवण्याशी निगडीत मुद्द्यांवर चर्चा झाली. त्या चर्चेचा प्रमुख भर लष्करी सहकार्य वाढवण्यावर होता. अमेरिकेचे दोन्ही मंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचीही भेट घेणार आहेत.
एकमेकांचे चांगले मित्र बनलेल्या भारत आणि अमेरिकेच्या मंत्र्यांमधील महत्वाची 2+2 चर्चेची तिसरी फेरी उद्या होईल. त्यावेळी भारत-चीन सीमेवरील तणावावर प्रामुख्याने चर्चा होईल. अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. तशातही पॉम्पिओ आणि एस्पर यांनी केलेल्या दौऱ्यामुळे अमेरिकेकडून भारताला दिले जात असलेले महत्व अधोरेखित झाले आहे.