पुणे – मागील सहा महिन्यांपासून थंडावलेल्या वाहन विक्री उद्योग दसऱ्याच्या मुहूर्तावर “रिस्टार्ट’ झाला. यावर्षी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे एकूण 6 हजार 454 वाहनांची नोंदणी झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत वाहन संख्येत अंशत: घट झाली असून, आरटीओच्या महसुलात मात्र वाढ झाली आहे.
यंदा करोनामुळे गुढीपाडवा आणि अक्षय्यतृतीयेला लॉकडाऊन असल्याने वाहन खरेदी झाली नाही. तर “अनलॉक’मध्ये वाहन विक्रीची चाके फिरण्यास सुरूवात झाली होती. मात्र, दसऱ्यावर देखील करोनाचे सावट असल्याने, यंदाच्या वाहनविक्रीबाबत संभ्रम होता. मात्र ,मागील दहा दिवसांमध्ये झालेल्या वाहन नोंदणीचे चित्र व्यापाऱ्यांसाठी दिलासादायक आहे. शुभ मुहूर्ताचे औचित्य साधून वाहन घरी आणण्यासाठी सुमारे 1 आठवडा आधीपासून वाहन नोंदणी प्रक्रिया सुरू होते.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दुचाकीच्या विक्रीत काही अंशी घट झाली आहे. मात्र चारचाकीच्या विक्रीत वाढ झाल्याचे चित्र आहे. यंदा प्रामुख्याने कॉलेजेस, खासगी क्लासेस बंद आहेत. शिवाय काही कार्यालयांतील कर्मचाऱ्यांचे “वर्क फ्रॉम होम’ सुरू आहे. त्यामुळे दुचाकींच्या विक्रीत घट झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
यंदाची वाहन नोंदणी
(कालावधी – दि.17 ते 25 ऑक्टोबर)
दुचाकी – 3,794
चारचाकी – 2,338
रिक्षा – 43
मालवाहू वाहने – 218
प्रवासी टॅक्सी – 8
बस – 3
अन्य – 50
प्राप्त महसूल : 31 कोटी 97 लाख 78 हजार 668 रुपये