राजनाथ: पाकिस्तान कुठल्याही क्षणी काळ्या यादीत
नवी दिल्ली: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी आर्थिक अनागोंदीवरून पाकिस्तानची यथेच्छ खिल्ली उडवली. लष्करीकरणावर नको तितका भर आणि चुकीच्या धोरणांमुळे पाकिस्तानात कुठलीच आर्थिक प्रगती होताना दिसत नाही. त्यामुळे त्या देशाचे पंतप्रधान इम्रान खान यांना विमानाची व्यवस्था करणेही कठीण बनले आहे, अशी टर राजनाथ यांनी उडवली.
संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला उपस्थित राहण्यासाठी इम्रान यांनी अलिकडेच अमेरिकेचा दौरा केला. पाकिस्तानला परतण्यासाठी त्यांना सौदी सरकारकडून विशेष विमान घ्यावे लागले. मात्र, त्या विमानातील तांत्रिक दोषामुळे इम्रान यांना पाकिस्तानला परतण्याऐवजी काही काळासाठी पुन्हा न्यूयॉर्कला जावे लागले. त्याचा संदर्भ राजनाथ यांनी येथे एका कार्यक्रमात बोलताना दिला. दहशतवादाच्या मुद्द्यावरूनही त्यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला. दहशतवादी संघटनांना पुरवला जाणारा निधी रोखण्यात अपयश येत असल्याबद्दल पाकिस्तान फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) या जागतिक संस्थेच्या रडारवर आहे. ती संस्था कुठल्याही क्षणी पाकिस्तानला काळ्या यादीत टाकू शकते, असे राजनाथ यांनी म्हटले. एफएटीएफने कारवाई केल्यास पाकिस्तानची जगभरात नाचक्की होईल. तेवढेच नव्हे तर, त्या देशावर विविध स्वरूपाचे आर्थिक निर्बंध येऊ शकतील.