राजस्थान पोटनिवडणूक : भाजपच्या बंडखोराने धमक्‍यांमुळे घेतला उमेदवारी अर्ज मागे ?

जयपूर – राजस्थानमधील सहाडा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतून भाजपचे बंडखोर उमेदवार लादूलाल पितलिया यांनी अचानकपणे माघार घेतली. त्यानंतर त्यांच्याशी संबंधित ऑडिओ व्हिडीओ आणि पत्र प्रसिद्ध झाल्याने मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. भाजपच्या दबावामुळे आणि धमक्‍यांमुळे पितलिया यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचे व्हिडीओ आणि पत्रातून सूचित होत आहे.

राजस्थानमधील सत्तारूढ कॉंग्रेसचे आमदार कैलाश त्रिवेदी यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक होत आहे. भाजपने तिकीट नाकारल्याने पितलिया यांनी बंडखोरी केली. त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. मात्र, शुक्रवारी त्यांनी अचानकपणे अर्ज मागे घेतला. त्यामुळे चर्चांना उधाण आले असतानाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर फिरू लागला. त्या व्हिडीओत पितलिया हे त्यांच्या कुटूंबावर कसला तरी दबाव असल्याचे म्हणताना आढळतात.

पितलिया यांनी कथितपणे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना लिहिलेले एक पत्रही समोर आले. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माझ्या कुटूंबीयांना धमक्‍या येत आहेत. त्यामुळे कुटूंबीयांना सुरक्षा पुरवावी, अशी मागणी त्या पत्रात करण्यात आली आहे. दरम्यान, संबंधित व्हिडीओ आणि पत्र म्हणजे कॉंग्रेसचे कारस्थान असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.