सातारा | वाई शहरात दंडात्मक कारवाई; पाच दुकाने सील

वाई (प्रतिनिधी) – वाई शहर तालुक्‍यात करोनाबाधितांची वाढती संख्या पाहता प्रशासनाने नियमांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर आणि सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्या दुकानदारांवर प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले, तहसीलदार रणजित भोसले, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसूरकर व सहकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने कारवाई करून 55 हजार रुपयांचा दंड वसूल केला.

काही बेजबाबदार दुकानदार व व्यावसायिकांना सात दिवस दुकाने बंद ठेवण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या. करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी व तहसीलदारांनी तालुक्‍यातील आठवडा बाजार यापूर्वीच बंद केले असले, तरी शहरात सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही. विनामास्क फिरणाऱ्यांची संख्याही जास्त आहे.

यामुळे महसूल विभाग, पंचायत समिती व पोलिसांनी संयुक्त मोहीम आखून वाई शहरात व ग्रामीण भागात नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचे उल्लंघन केल्याबद्दल रविवारी पाच दुकाने सील करण्यात आली, तर 50 ते 55 नागरिकांकडून दंड वसूल करण्यात आला. 

बावधन रोडवरील मधुरा गार्डन या कार्यालयात मर्यादेपेक्षा जास्त नागरिकांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम झाल्याबद्दल कार्यालय मालगावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवायांमुळे नागरिक व दुकानदारांना चपराक बसली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.