पुणे : देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांची 2020 सालची यादी (राष्ट्रीय संस्थात्मक नामांकन) जाहीर झाली असून, त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सलग चौथ्या वर्षी पहिल्या दहामध्ये स्थान कायम ठेवले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पुणे विद्यापीठाची कामगिरी एक क्रमांकाने उंचावली असून, देशातील विद्यापीठांमध्ये नववे स्थान पटकावले आहे. गतवर्षी दहावे स्थान पुणे विद्यापीठाला मिळाले होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे पहिल्या दहा विद्यापीठांच्या यादीत स्थान मिळविणारे महाराष्ट्रातील एकमेव विद्यापीठ ठरले आहे. विद्यापीठ गटात पुणे विद्यापीठ सरस ठरले असली तरी देशातील सर्व संस्थांच्या गटामध्येही (ओव्हर ऑल) पुणे विद्यापीठाची दोन क्रमांकांनी नामांकन घसरले असून, यंदा 19 वे स्थान मिळाले आहे.
केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे ही नामांकने दिली जातात. क्रमवारी ठरविताना विद्यापीठे, सर्व संस्था, अभियांत्रिकी, महाविद्यालये, व्यवस्थापन, फार्मसी, वैद्यकीय, स्थापत्यशास्त्र व कायदा असे एकंदर नऊ गट निश्चित करण्यात आले होते. त्यांचा दर्जा ठरवण्यासाठी विविध निकष ठरवण्यात आले होते. विद्यापीठांच्या गटात यंदा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 61.13 गुणांसह नववे स्थान पटकावले आहे. गेल्या वर्षी सावित्रीबाई पुले पुणे विद्यापीठाला 58.40 इतके गुण होते. सर्व संस्थांच्या गटामध्ये (ओव्हर ऑल) या विद्यापीठाची क्रमवारी घसरली असून, यंदा 19 वे स्थान मिळवले आहे. गतवर्षी पुणे विद्यापीठाने 17 वे स्थान मिळविले होते.
‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापाठाने यंदा देशात नववे स्थान मिळवणे ही आनंदाची बाब आहे. सर्वात महत्त्वाची म्हणजे पुणे विद्यापीठाबद्दल “परसेप्शन’ या गटात गतवर्षीच्या 16.55 वरून यंदा 44.99 इतके गुण मिळाले आहेत. त्यावरून लोकांचा विद्यापीठाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुधारला आहे. सर्व प्राध्यापक, विद्यार्थी व अधिकार मंडळांच्या कार्याचे हे सामूहिक यश आहे’.
प्रा. (डॉ.) नितीन करमळकर, कुलगुरू