जम्मू : नार्कोटिक दहशतवादाचे एक मोड्यूल जम्मू काश्मिर पोलिसांनी उद्ध्वस्त केले. कुपवारा जिल्ह्यातील हिंदवारा तालुक्यात लष्कर ए तोयबाच्या तीन साथीदारांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्यांच्याकडून 21 किलो हिरोईन आणि एक कोटी 34 लाख रुपयांचे भारतीय चलन जप्त करण्यात आले.
हांदवाराचे पोलिस अधिक्षक डॉ. जीव्ही संदीप चक्रवर्ती यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. ते म्हणाले, जम्मू काश्मिरमधील लष्कर ए तोयबाच्या कारवायांना लागणारा पैसा या अंमली पदार्थाच्या विक्रीतून उभा केला जात असे. सीमेपलिकडून अंमली पदार्थ आणून त्याची देशात तस्करी केली जात असे.
या रॅकेटचे हवाला व्यवहारामार्फत व्यवहार चालत असत.
अलिकडच्या काळात अशा स्वरूपाचे उद्ध्वस्त केलेले हे दहशतवादाचे सर्वात मोठे मोड्यूल होते. अटक केलेल्या तीनही जणांकडून लष्कर ए तोयबाच्या काश्मिरातील कारवायांना पैसा पुरवला जात असे. प्रत्यक्षात रोकड न हलवताही भली मोठी रक्कम या कारवायांसाठी दिली जात असे.
अटक केलेल्या लष्करच्या तीनही हस्तकांची ओळख पटली असून त्यांचा म्होरक्या इफ्तीकार इंद्राबी आहे. त्याच्यावर अंमली पदार्थ तस्करीचे अनेक गुन्हे नोंदवले आहेत. त्याच्या जावयालाही अटक करण्यात आली आहे.