हिमाचल प्रदेशात पुन्हा एकदा ढगफुटी झाली आहे. सोलान जिल्ह्यातील कंडाघाट उपविभागातील जदोन गावात ढगफुटीमुळे दोन घरे कोसळली असून त्यात सात जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये चार महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. यात दोन जणांना वाचविण्यात यश मिळाले आहे.
शिमल्यातील समरहिल येथील शिव मंदिराला भूस्खलनाचा तडाखा बसला आहे. सकाळी येथे पूजेसाठी आलेले 20 भाविक मंदिर कोसळल्यानंतर मंदिराच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. बचाव पथकाकडून युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले आहे.
या दुर्घटनेनंतर हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी सोलनच्या जदोन गावात ढगफुटीमुळे सात जणांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. “या कठीण काळात पीडित कुटुंबांना सर्व शक्य मदत आणि समर्थन सुनिश्चित करण्याचे निर्देश आम्ही अधिकाऱ्यांना दिले आहेत,” असे ट्वीट त्यांनी केले आहे.
Himachal Pradesh | A cloud burst reported at Jadon village of Kandaghat sub division in Solan. Two houses and one cowshed washed away. Details awaited.
(Photos : District Disaster Management Authority, Solan) pic.twitter.com/lz4l4khsRS
— ANI (@ANI) August 14, 2023
हिमाचल प्रदेशमधील शिमला चंबा, कांगड़ा, कुल्लू, मंडी, लाहौल या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांना पाऊस आणि पूराचा धोका असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे येथील शाळा, महाविद्यालये आणि शिक्षण संस्थांना सुट्टी देण्यात आली आहे. तसेच येथील काही रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
तर दुसरीकडे, उत्तराखंडमध्येही संततधार पावसामुळे भूस्खलन झाले असून बियास नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. राज्यांमधील अनेक भागातील शाळा आणि महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आली आहे.