पिंपरी -पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रारुप प्रभागरचनेचा आराखडा प्रसिद्ध झाला आहे. या प्रभागरचनेमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. विद्यमान नगरसेवकांच्या प्रभागांची मोडतोड झाली असून रेल्वेमार्ग, रस्ते, नाले ओलांडून एकसंध भाग तोडला असल्याचे आक्षेप घेण्यात आले आहेत. आराखड्यावर हरकत घेण्याऱ्यांची संख्या वाढली असून एकाच दिवसात तब्बल 501 हरकती आल्या आहेत.
आगामी महापालिका निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या 46 प्रभागांच्या प्रारूप आराखड्यावर हरकती नोंदविण्यासाठी सोमवार (दि.14) पर्यंत मुदत आहे. त्यामुळे हरकती नोंदविण्याची संख्या वाढत आहे. पालिकेच्या निवडणूक विभागाकडे मंगळवारी (दि.8) 65 हरकती जमा झाल्या. तर बुधवारी (दि. 9) तब्बल 501 हरकतींची नोंद निवडणूक विभागामध्ये झाली आहे.
आतापर्यंत प्रारुप आराखड्यावर पहिल्या दिवशी एक, दुसऱ्या दिवशी तीन व तिसऱ्या दिवशी नऊ हरकती प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर दोन दिवसांच्या सुटट्टीनंतर दोन दिवसांत तब्बल 566 हरकती प्राप्त झाल्या आहेत विद्यमान नगरसेवकांच्या प्रभागाची मोडतोड झाली असून, हक्काचे मतदार बाजुला गेल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रभागरचनेवर
25 फेब्रुवारीला सुनावणी
सुनावणी घेण्यासाठी निवडणूक आयोगाकडून राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्याकडून 25 फेब्रुवारीला प्राप्त झालेल्या सर्व हरकतींवर सुनावणी होणार आहे. सुनावणीला उपस्थित राहण्याबाबत हरकत नोंदविणाऱ्यांना कळविले जाणार आहे, असे महापालिकेचे सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी सांगितले.