पिंपरी – गेल्या 90 वर्षांपासून निष्पक्ष आणि निर्भीड पत्रकारितेची परंपरा जोपासणाऱ्या दैनिक प्रभातच्या पिंपरी-चिंचवड विभागीय कार्यालयाचा वर्धापन दिन गुरुवारी (दि. 24) मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. करोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग आणि सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे पालन करत आयोजित करण्यात आलेल्या स्नेहमेळाव्याला पिंपरी-चिंचवडसह मावळमधील सर्वच क्षेत्रात कार्यरत असलेल्या नागरिकांनी हजेरी लावत “प्रभात’वर कौतुकाचा वर्षाव केला.
राजकीय, उद्योग, व्यापार, प्रशासकीय, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांसह वकील, डॉक्टर, अभियंता, पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपली उपस्थिती नोंदविली. गुलाबी थंडीत मसाला दुधाची चव चाखत दैनिक प्रभातवर प्रेम करणाऱ्या वाचकांनी स्नेहमेळाव्यात गप्पांची मैफल रंगविली. प्रभातचे आणि आपले वर्षानुवर्षांचे ऋणानुंबध या गप्पांमधून उलगडत गेले.
सायंकाळच्या आल्हाददायक आणि प्रसन्न वातावरणात दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. या वेळी दैनिक प्रभातचे व्यवस्थापकीय संचालक आनंद गांधी यांच्यासह माजी महापौर योगेश बहल, माजी उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, महापालिका उपायुक्त चंद्रकांत इंदलकर, प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे, सहायक पोलीस आयुक्त गणेश बिरादार, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, उद्योजक दिलीप भरणे, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव अनिल जाधव, पी. के. इंटरनॅशनल स्कूलचे जगन्नाथ काटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
या वेळी दैनिक प्रभातचे सरव्यवस्थापक बी.एल. स्वामी, सीए. रवी इंडी, जाहिरात व्यवस्थापक प्रवीण पारखी उपस्थित होते.
दैनिक प्रभातला शुभेच्छा देण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार गजानन बाबर, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, उपमहापौर केशव घोळवे, स्थायी समितीच्या माजी सभापती सीमा सावळे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, सहायक आयुक्त आर. आर. पाटील यांच्यासह सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शविली.
तसेच प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, जरे ग्रुपचे मनोज जरे, विशाल मुरे, ओम लॅण्ड डेव्हलपर्सचे संजय काळोखे, दिगंबरा प्रॉपर्टीचे संदीप मोरे, तसेच महापालिकेचे उपायुक्त मनोज लोणकर, सहायक आयुक्त राजेश आगळे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी पवन साळवे, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण गोफणे, समाजविकास अधिकारी संभाजी ऐवळे, भांडार अधिकारी मुबारक पानसरे, लेखाधिकारी शेंडगे, महापालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, उद्योजक विनोद बन्सल यांनी स्नेहमेळाव्याला हजेरी लावत शुभेच्छा दिल्या.