नवी दिल्ली – हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे गेल्या तीन दिवसांत आतापर्यंत ७१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, 13 लोक अद्याप बेपत्ता आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. सगळीकडे केवळ पुराचे चित्र आहे. राज्याचे हजारो कोटींचे नुकसान होत आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी पायाभूत सुविधांच्या पुनर्बांधणीचे काम सुरु केल्याचे म्हंटले आहे.
राज्याचे प्रधान सचिव (महसूल) ओंकार चंद शर्मा म्हणाले, “गेल्या तीन दिवसांत ७१ जणांचा मृत्यू झाला असून १३ जण अद्याप बेपत्ता आहेत. रविवारी रात्रीपासून ५७ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.” पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सुखविंदर सुखू म्हणाले की, पावसामुळे झालेले नुकसान दुरुस्त करण्यासाठी किमान एक वर्ष लागेल. ते म्हणाले की, राज्याचे सुमारे 10,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
पूरस्थिती गंभीरच
हिमाचल प्रदेशात मान्सूनच्या अवघ्या 54 दिवसांत 742 मिमी पाऊस पडला आहे, जो जून ते 30 सप्टेंबर दरम्यानच्या हंगामातील सरासरी 730 मिमी पावसापेक्षा जास्त आहे. हवामान खात्याच्या अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली. शिमला हवामान केंद्राचे संचालक सुरिंदर पॉल यांनी सांगितले की, जुलैमध्ये झालेल्या पावसाने गेल्या 50 वर्षांचा विक्रम मोडला.
मनाली, सोलन, रोहरू, उना, घमरूर, हमीरपूर आणि केलॉन्ग या शहरांनी 9 जुलै रोजी महिन्यातील एकाच दिवसात पावसाचे पूर्वीचे सर्व विक्रम मोडले असल्याची माहितीही त्यांनी दिली. या दिवशी राज्यात अभूतपूर्व पावसाची नोंद झाली. पॉल म्हणाले की, हिमाचल प्रदेशात 7 ते 10 जुलै या चार दिवसांत 223 मिमी पावसाची नोंद झाली आहे, जी याच कालावधीतील सरासरी 41.6 मिमी पावसाच्या चौपट आहे.
रविवारपासून राज्यात पावसाची दुसरी फेरी सुरू आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, येत्या काही दिवसांत मान्सून कमकुवत होईल आणि 25 ऑगस्टला पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. या मोसमात राज्यातील अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद होत आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, या पावसाळ्यात राज्यातील पावसाशी संबंधित अपघातांमध्ये मृतांची संख्या 327 वर पोहोचली आहे.