रेल्वे प्रवासी वाहतूक पुन्हा ‘ट्रॅक’वर

पुण्यातून आणखी 3 गाड्यांचे “प्रस्थान’

पुणे – करोना पार्श्‍वभूमीवर बंद असणारी रेल्वेची प्रवासी वाहतूक पुन्हा “ट्रॅक’वर येत आहे. पुढील टप्प्यात मध्य रेल्वे प्रशासनाने आणखी 3 मार्गांवर 4 गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला असून यामध्ये पुण्यातून 3 गाड्या सुटणार आहेत.

मध्य रेल्वेकडून पुढील आठवड्यापासून पुणे-हावडा, पुणे-हजरत निजामुद्दीन, लोकमान्य टिळक टर्मिनस-कामाख्या या मार्गांवर विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. या गाड्यांमध्ये केवळ “कन्फर्म’ तिकीट असणाऱ्यांनाच प्रवास करता येणार आहे. या गाड्यांचे आरक्षण 13 ऑक्‍टोबरपासून सुरू होणार आहे. केंद्र आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर तिकीट आरक्षित करता येणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

पुण्यातून धावणार गाड्या…
पुणे-हावडा दुरांतो एक्‍स्प्रेस ही विशेष गाडी येत्या 17 तारखेपासून पुण्याहून प्रत्येक सोमवारी आणि शनिवारी सुटणार आहे. ही गाडी दुसऱ्या दिवशी हावडा येथे पोहोचेल. तर येत्या 15 तारखेपासून हावडा येथून दर गुरुवारी आणि शनिवारी धावणार आहे. दुसऱ्या दिवशी पुणे येथे पोहोचणार आहे. दौंड वगळता या गाडीचे वेळापत्रक आणि थांबे पुणे-हावडा-पुणे दुरांतोप्रमाणे आहेत.

पुणे-हजरत निजामुद्दीन एक्‍स्प्रेस…
पुणे-हजरत निजामुद्दीन एसी एक्‍स्प्रेस साप्ताहिक विशेष गाडी येत्या 18 तारखेपासून पुण्याहून दर रविवारी सुटणार आहे. दुसऱ्या दिवशी हजरत निजामुद्दीन येथे पोहोचणार आहे. तर येत्या 16 तारखेपासून दर शुक्रवारी हजरत निजामुद्दीन येथून सुटणार आहे. दुसऱ्या दिवशी पुणे येथे पोहोचणार आहे. या गाडीचे वेळापत्रक आणि थांबे दर्शन एक्‍स्प्रेसप्रमाणे आहेत.

पुणे-हजरत निजामुद्दीन दुरांतो एक्‍स्प्रेस…
पुणे-हजरत निजामुद्दीन दुरांतो विशेष एक्‍स्प्रेस येत्या 16 तारखेपासून प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी पुण्याहून सुटणार आहे. तर हजरत निजामुद्दीन येथून येत्या 15 तारखेपासून सोमवार, गुरूवारी सुटणार असून, दुसऱ्या दिवशी पुणे येथे पोहोचणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.