वाल्हे – जेऊर-नीरा मार्गावर असणाऱ्या पिंपरे खुर्द (ता. पुरंदर) हद्दीत असणारे रेल्वे गेट मंगळवारी (दि. 18) दिवसभर (12 तास) वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. या दरम्यान, नागरिकांनी वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे रेल्वे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
पुरंदर तालुक्यातील नीरा-जेऊर, मांडकी, वीर, सारोळा या मार्गावर मिरज-पुणे रेल्वे लाईनवरील जेऊर फाटा येथे रेल्वेचे 28 नंबर किलोमीटर 80 / 4-5 गेट आहे. हे गेट रेल्वे मार्गाचे काम करण्यासाठी, व निरीक्षणासाठी मंगळवारी सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी मांडकी व जेऊर ग्रामपंचायतीला दिली आहे.
या दरम्यान जेऊर, मांडकीच्या नागरिकांनी वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. स्थानिक लोकांनी त्यांना शक्य असेल त्या मार्गाचा वापर करून रेल्वे प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.