नवी दिल्ली – आयकर विभागाने महाराष्ट्र आणि ठाणे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या युनिकॉर्न नावाच्या एका स्टार्टअप कंपनीवर छापा घालून सुमारे 224 कोटींची बेहिशोबी मालमत्ता उघडकीला आणली आहे. या कंपनीच्या कर्नाटक, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशातील ठिकाणांवरही 9 आणि 23 मार्चला छापे घालण्यात आले होते.
ही स्टार्टअप कंपनी बांधकाम साहित्य पुरवण्याचे काम करते. तिची वार्षिक उलाढाल सहा हजार कोटी रूपयांची आहे. कंपनीच्या संचालकांनी कंपनीचे खोटे हिशोब दाखवून मोठ्या प्रमाणात करचोरी केली असून तब्बल 224 कोटी रूपयांची बेहिशोबी मालमत्ता जमवली आहे. या कंपनीने विदेशी गुंतवणुकदारांना आपल्या कंपनीचे शेअर्स विकून मोठी माया जमवली आहे.
खोट्या कंपन्यांद्वारे त्यांनी हवालाचेही व्यवहार केल्याचे दिसून आले आहे. या कंपन्या केवळ कागदावरच अस्तित्वात आहेत त्यांच्या नावाने अनेक बोगस एन्ट्री हिशोबात करण्यात आल्या आहेत. हा बोगस हिशोबही पंधराशे कोटी रूपयांचा आहे असे आयकर विभागाच्या सूत्रांनी म्हटले आहे.