अहमदाबाद – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी दाखल केलेल्या आव्हान याचिकेवर 29 एप्रिलला गुजरात उच्च न्यायालयात सुनावणी होईल. सुरत सत्र न्यायालयाने मानहानीच्या खटल्यात राहुल यांना दोषी ठरवण्याला स्थगिती देण्यास नकार दर्शवला. त्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका राहुल यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.कर्नाटकमध्ये मागील लोकसभा निवडणुकीतील (2019) प्रचारावेळी राहुल यांनी मोदी आडनावाविषयी टिप्पणी केली.
त्याबद्दल गुजरातमधील भाजपचे आमदार पुर्णेश मोदी यांनी राहुल यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला. त्याप्रकरणी सुरतमधील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने राहुल यांना दोषी ठरवले. त्यांना दोन वर्षे तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द झाली.
मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवण्याला स्थगिती मिळावी यासाठी राहुल यांनी सत्र न्यायालयात दाद मागितली. मात्र, तिथे दिलासा न मिळाल्याने राहुल यांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. आता त्या न्यायालयाचे न्यायाधीश हेमंत प्राच्छक यांच्या समोर सुनावणी होईल. याआधी न्यायाधीश गीता गोपी यांनी त्यांच्या समोर सुनावणी घेण्यास नकार दर्शवला.