लंडन – कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी फोनवरून संवाद झाल्याने पक्षाचे ब्रिटनस्थित कार्यकर्ते सुखावले. कॉंग्रेस नेते राहुल गांधी त्या संभाषणातील दुवा ठरले.
राहुल सध्या ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी शनिवारी इंडियन ओव्हरसीज कॉंग्रेसच्या (आयओसी) ब्रिटनमधील सदस्यांशी चर्चा केली. त्या सदस्यांची मते जाणून घेताना राहुल यांनी त्यांना चकित केले. राहुल यांनी अचानकपणे सोनियांना फोन कॉल केला. त्यामुळे सोनिया आणि आयओसीच्या सदस्यांमध्ये संवाद घडला.
आगामी निवडणुकांत कॉंग्रेसला विजय मिळवून देण्यासाठी कठोर मेहनत करण्याचे आवाहन सोनियांनी त्या सदस्यांना केले. परदेशस्थ भारतीयांसाठी कॉंग्रेसने आयओसीची स्थापना केली आहे. आयओसीच्या विविध देशांमध्ये शाखा आहेत. दरम्यान, आयओसी-ब्रिटनचे अध्यक्ष कमल धालीवाल आणि इतर सदस्यांनी राहुल यांना कॉंग्रेसचे अध्यक्षपद पुन्हा स्वीकारण्याचे आवाहन केले.
राहुल यांच्या नेतृत्वाखाली पक्ष पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारतातील बहुतांश कॉंग्रेसजनांकडून राहुल यांना पुन्हा धुरा स्वीकारण्याचे साकडे घातले जात आहे. तशीच भावना कॉंग्रेसच्या परदेशस्थ सदस्यांमध्येही असल्याचे सूचित होत आहे.