नवी दिल्ली – कॉंग्रेसने पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करावा अशी आग्रही मागणी पक्षाचे खासदार मणिक्कम टागोर यांनी केली आहे. एवढेच नव्हे तर, पक्षाचे नेते राहुल गांधी यांचे नावही त्यांनी पुढे केले आहे.
लोकसभा निवडणूक अवघ्या वर्षभरावर येऊन ठेपली आहे. त्या रणसंग्रामात भाजपला तगडी लढत देण्याच्या उद्देशातून ऐक्य घडवण्यासाठी विरोधक प्रयत्नशील आहेत. अशात एका सर्वेक्षणाचे निष्कर्ष जाहीर झाले. त्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच 43 टक्के जनता त्या पदावर पाहू इच्छित असल्याचे सूचित झाले.
तर, पंतप्रधानपदासाठी राहुल यांना 27 टक्के पसंती मिळाली. त्याचा संदर्भ देऊन टागोर यांनी स्वपक्षीयांना आवाहन करणारे एक ट्विट केले. राहुल यांचे नाव पक्षाने प्रोजेक्ट केलेले नाही. तसे असूनही पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून त्यांना मोठी पसंती मिळत आहे.
त्याविषयी घोषणा झाल्यावर किती पाठिंबा मिळतो ते पहा. आपल्याकडे पंतप्रधानपदाचा उमेदवार असल्याविषयी आपण स्पष्ट असायला हवे. पंतप्रधानपदाचा उमेदवार आपण जाहीर करायलाच हवा, असे त्यांनी म्हटले.