मुंबई – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. त्यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, आम आदमी पक्षाचे राज्यसभा सदस्य संजय सिंह आणि राघव चढ्ढा तसेच दिल्लीचे मंत्री आतिशी हे उपस्थित होते.
दिल्ली सरकारचे अधिकार मर्यादित करण्यासाठी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिलेला निर्णय निरस्त करण्यासाठी केंद्र सरकार संसदेच्या अधिवेशनात एक प्रस्ताव आणणार आहे. तो प्रस्ताव राज्यसभेत मंजुर होऊ नये यासाठी केजरीवाल विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करीत आहेत. त्या अंतर्गतच त्यांनी उद्धव ठाकरे यांची ही भेट घेतली. याच संबंधात ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेणार आहेत.
केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची या आधीच कोलकाता येथे भेट घेतली आहे. केजरीवाल सध्या याच मोहीमे अंतर्गत संपुर्ण देशभर दौरे करणार आहेत.
केंद्राने शुक्रवारी दिल्लीतील गट-अ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्तीसाठी प्राधिकरण तयार करण्यासाठी एक अध्यादेश जारी केला, याच अध्यादेशाला कायद्याचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केंद्राकडून संसदेच्या अधिवेशनात केला जाणार आहे.