नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी तुघलक रोड लेन स्थित आपल्या सरकारी बंगल्याची चावी लोकसभा सचिवालयाला सुपूर्द केली. राहुल यांनी बंगला स्वतः लॉक केला. त्यानंतर त्यांनी चावी लोकसभेच्या कर्मचाऱ्यांना सोपवली. त्यांच्याशी हस्तांदोलन केले. त्यानंतर आई व बहीण प्रियंकांसोबत सोनिया गांधींच्या 10 जनपथ या सरकारी निवासस्थानाकडे रवाना झाले. आता ते तिथेच राहतील.
बंगला सोडल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले की, अमेठीतून 2004 मध्ये निवडून आल्यानंतर 2005 मध्ये मला हा बंगला मिळाला होता. भारताच्या जनतेने तब्बल 19 वर्षे मला हे घर दिले. मी त्यांचे आभार मानतो. मी खरे बोलण्याची किंमत मोजली आहे. मी खऱ्यासाठी कोणतीही किंमत मोजण्यास तयार आहे.
दुसरीकडे, प्रियंका म्हणाल्या की, माझा भाऊ जे काही बोलला, ते एकदम खरे आहे. त्यांनी सरकारची वस्तुस्थिती सांगितली. त्यामुळे त्यांच्यासोबत हे सर्वकाही होत आहे. पण ते खूप हिंमतवान आहेत. ते कुणालाही घाबरणार नाहीत. आम्हीही न घाबरता आपला संघर्ष सुरू ठेवू.
नव्या जागेच्या शोधात राहुल गांधी
सूत्रांच्या माहितीनुसार, राहुल आपल्या कार्यालयासाठी नव्या जागेच्या शोधात आहेत. सध्या ते आपल्या मातोश्री सोनिया गांधी यांच्यासोबत त्यांच्या घरी राहत आहेत. राहुल यांनी शुक्रवारीच बंगल्यातील बहुतांश सामान खाली केले होते. काही वर्षांपूर्वी, प्रियंका गांधी यांनाही डझ सुरक्षा हटवल्यानंतर लोधी इस्टेट स्थित बंगला खाली करावा लागला होता.
22 एप्रिलपर्यंत घर खाली करण्याचे होते आदेश
खासदारकी गेल्यानंतर राहुल गांधी यांना 22 एप्रिलपर्यंत बंगला खाली करण्याचे आदेश देण्यात आले होते. राहुल यांनी 14 एप्रिल रोजी आपले बहुतांश सामान सोनिया गांधींच्या 10, जनपथ स्थित निवासस्थानी हलवले होते.