नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेदरम्यान श्रीनगरमध्ये केलेल्या वक्तव्यावरून आणि लंडनमध्ये भारतीय लोकशाहीविषयी केलेल्या कथिच विधानावरून संसदेत सत्ताधाऱ्यांनी तीव्र आक्षेप घेतले आहेत. त्यामुळे गेल्या आठवड्यात सलग पाच दिवस संसदेचे कामकाज होऊ शकले नाही. त्यावरूनच आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राहुल गांधी आणि भाजप यांच्यावर निशाणा साधला आहे.
ममता बॅनर्जींनी तृणमूल काँग्रेसच्या अंतर्गत पदाधिकारी-नेत्यांच्या बैठकीमध्ये भाजपा आणि काँग्रेसविषयी परखड भूमिका मांडली आहे. “जर राहुल गांधी हेच विरोधी पक्षांचा चेहरा असतील, तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात कुणीच ठामपणे उभं राहू शकणार नाही”, असे ममता बॅनर्जी या बैठकीमध्ये म्हणाल्या.
दरम्यान, या बैठकीत बोलताना ममता बॅनर्जींनी राहुल गांधींना मोदांची टीआरपी (टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट) म्हटले आहे. “राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सर्वात मोठे टीआरपी आहेत. भाजपा संसदेचं कामकाज चालू देत नाहीये कारण त्यांना राहुल गांधी हेच विरोधी पक्षांचे नेते म्हणून हवे आहेत. भाजपाला राहुल गांधींना हिरो बनवायचं आहे”, असे त्या म्हणल्या.
ममता बॅनर्जींनी भारतीय जनता पार्टी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. “भाजपा आणि माकपा हे अल्पसंख्यकांना तृणमूल काँग्रेसविरोधी भडकवत आहेत. काँग्रेस भाजपासमोर मान तुकवत आहे”, असं त्या म्हणाल्या. नुकताच पश्चिम बंगालमध्ये अल्पसंख्यबहुल मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारानं तृणमूलच्या उमेदवाराचा पराभव केला. त्यानंतर ममता बॅनर्जींनी भाजपा आणि काँग्रेसवर पडद्यामागील युतीचा आरोप केला होता.